
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना मंगळवारी (दि.22) दुपारी साडेबाराच्या सुमारास मेनरोड येथील सांगली बँक सिग्नल येथे घडली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षास ही माहिती समजताच घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांतील टवाळखोरांना ताब्यात घेतल्याने वातावरण निवळले. हा प्रसंग पाहताना नागरिक भयभीत झाले. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल असल्याचे पोलिसांनी सांगताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अवघ्या आठवडाभरावर गणेशोत्सव आल्याने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. त्यातच खबरदारी म्हणून पोलिसांकडून गस्त वाढवण्यासोबतच मॉकड्रिल करून पोलिसांचा प्रतिसाद किती वेळात मिळतो, याची चाचपणी केली जात आहे. सर्व पोलिस ठाणेनिहाय गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरू आहे. मॉकड्रिलबाबत पोलिस ठाणेनिहाय माहिती देण्यात आलेली नव्हती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास नियंत्रण कक्षातून दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिसांना त्वरित रेडक्रॉस सिग्नलजवळ पोहोचण्याचे आदेश मिळाले.
दोन गटांत वाद झाल्याचे समजताच उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे आणि दत्ता पवार यांच्या पथकाने धाव घेतली. लाठ्याकाठ्यांसहित सशस्त्र पोलिस अचानक दाखल झाल्यावर नागरिकांचा थरकाप उडाला. वाहनांतून पोलिस उतरताच त्यांनी टवाळखोरांना ताब्यात घेतले. यानंतर ध्वनिक्षेपकावरून ‘मॉकड्रिल’ असल्याचे सांगत गणेशोत्सवाच्या काळात शांतता राखण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. त्यासाठी पोलिसांचा सराव सुरू आहे.
हेही वाचा :
- पाकिस्तानात चुकून पडले ब्राह्मोस क्षेपणास्त्र, भारतीय वायुसेनेचे ३ अधिकारी बडतर्फ
- नाशिक : तारेच्या कुंपणात अडकला, बिबट्या दोन तास वेदना सहन करत राहिला; अखेर वनविभागने घेतली धाव
- पिंपरी : लग्नाच्या आमिषाने समुपदेशक महिलेची फसवणूक
The post नाशिक : बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा, टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात appeared first on पुढारी.