नाशिक : बेघर शोध मोहिमेत 32 जणांना मिळाला निवारा

बेघर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी बेघर शोध मोहीम राबवित 32 जणांना निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

शहरातील फुटपाथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक, धार्मिक स्थळे परिसर आदी ठिकाणी रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपणार्‍या बेघर नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधायुक्त निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. शहरातील उड्डाणपूल, गंगाघाट, रामकुंड परिसरात 19 जानेवारीला रात्री बेघर नागरिक शोध मोहीम राबविण्यात आली. यात मनपाचे एनयूएलएम विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक, समूह संघटक, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासन तसेच बेघर निवारा केंद्राचे विनामूल्य देखभाल व व्यवस्थापन करणारे त्र्यंबकचे रामकृष्ण आरोग्य संस्थान सहभागी झाले होते. विविध ठिकाणी आढळलेले 32 वृद्ध, रुग्ण आणि दिव्यांग बेघरांना मनपाच्या वाहनामार्फत निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. मनपाचे तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्र आणि त्रंबक येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. बेघर नागरिकांना निवारा केंद्रात दाखल केल्यानंतर संस्थेमार्फत तत्काळ अंथरूण, पांघरूण, साहित्य आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली. शहरात कोठेही बेघर नागरिक आढळल्यास अशा नागरिकांना निवारा केंद्रात दाखल करण्यासाठी 7588188065 या हेल्पलाइन नंबरवर (Helpline number) संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बेघर शोध मोहिमेत 32 जणांना मिळाला निवारा appeared first on पुढारी.