नाशिक : बेपत्ता उद्योजकाचा मालेगावात सापडला मृतदेह

मृतदेह,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील फर्निचर उद्योजकाचे अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह मालेगावजवळ सापडला असून, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

शिरीष गुलाबराव सोनवणे (वय 56) असे या मृत उद्योजकाचे नाव आहे. त्यांचा एकलहरे रोड येथे स्वस्तिक फर्निचर हा कारखाना आहे. सध्या के. जे. मेहता हायस्कूलजवळ राहणारे सोनवणे नऊ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका पांढऱ्या गाडीतून कोणास काही न सांगता निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कारखान्यातील नोकर फिरोज लतीफ शेख याने यासंदर्भात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे आणि पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलिस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत सतर्क केले. त्यांच्या शोधासाठी तीन पथक तैनात करण्यात आल्या होते. त्यापैकी एक पथक शिंदे गाव टोल प्लाजा येथे तर दुसरी टीम घोटी टोल प्लाजा येथे रवाना झाली होती, तर तिसरे पथक स्थानिक पोलिस ठाण्यांत तपास करत होते. याचदरम्यान शिरीष सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सायतार पाडे शिवारात पाटकालव्यात 10 सप्टेंबरला पाण्यात तरंगताना आढळला. या संदर्भात मालेगाव पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहे. शिरीष सोनवणे यांचा खून का करण्यात आला याबाबत पोलिस कसून शोध घेत आहे. त्याचप्रमाणे त्यांचे अपहरण कोणी केले त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

The post नाशिक : बेपत्ता उद्योजकाचा मालेगावात सापडला मृतदेह appeared first on पुढारी.