नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

मनुका www.pudhari.news

नाशिक (उगांव, ता. निफाड): पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात सोमवार, दि. ६ पहाटेच्या २: ३० वा पासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष व कांदा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे तर द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहे.

निफाड तालुक्यातील निफाडसह उगांव, शिवडी, नांदुर्डी, खडकमाळेगांव, रानवड, नैताळे, सोनेवाडी, शिवरे  आदी ग्रामीण भागात पहाटेपासूनन विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून हवेत गारवा निर्माण झाला असून पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे. निर्यातीच्या हेतूने द्राक्षबागेत पेपर वेष्टन करुन ठेवलेल्या द्राक्षघडांत पाणी साचून गारव्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका आहे.  त्यामुळे पेपरचे वेष्टन काढण्याची नामुष्कीदेखील द्राक्ष बागायतदारांवर आलेली आहे. पहाटेपासूनच पाऊस सुरु असल्याने बहुसंख्य व्यापारी वर्गाने द्राक्षमालाची काढणी थांबविली आहे. तसेच पावसामुळे शेतात सुकविण्यासाठी ठेवलेले द्राक्षमणी भिजले आहेत. तर कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढुन कांदा पिकही धोक्यात आले आहे. एकूणच द्राक्ष व कांदा उत्पादकांना बेमोसमी पाऊसाने मेटाकुटीस आणले आहे.

बेमोसमी पावसामुळे काढणीस आलेल्या परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका आहे. ते त्वरित दिसणार नाहीत तर स्वच्छ सुर्यप्रकाश पडल्यावर त्याचे परिणाम दिसून येतील. त्यामुळे या नुकसानीची तीव्रता अजुन एक दोन दिवसात अधिक प्रमाणात जाणवेल. – छोटुकाका पानगव्हाणे, अध्यक्ष द्राक्ष संघर्ष समिती.

हेही वाचा:

The post नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.