Site icon

नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अचानकच दोन कंपन्यांनी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकची विमानसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. अशात पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र पाठवून जानेवारी 2023 पासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू करण्याबाबत सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण करू न शकलेल्या अलायन्स एअरला कालावधी वाढवून देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी कळविले असल्याची माहिती आयमाचे मनीष रावल यांनी दिली आहे.

भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडानअंतर्गत किमान दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यास प्रतिसाद देत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत आश्वस्त केले आहे. दरम्यान, भुजबळ यांनी पत्रात म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्किमअंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला नऊ शहरांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु तीन वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान 1, उडान 2, उडान 3 मधील बिडिंगदरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला बगल दिली असल्याचे म्हटले होते. तसेच अहमदाबाद आणि पुण्यासाठी एअर अलायन्स, अहमदाबादसाठी ट्रूजेट आणि बेळगावसाठी स्टार एअरने या सेवा सुरू केल्या होत्या. परंतु ट्रूजेटने ऑपरेशन बंद केले होते. तसेच स्टार एअर नाशिकमधून ऑपरेशन्स स्थगित करत आहे. त्यामुळे उडान योजनेच्या उद्देशाला आणखी धक्का बसणार आहे. त्यामुळे या विमान कंपन्यांना उडानअंतर्गत किमान दोन वर्षे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती.

भुजबळांच्या पत्राला केंद्रीय मंत्री सिंधिया यांना उत्तर दिले असून, त्यात म्हटले की, नाशिक विमानतळ अहमदाबाद, बंगळुरूशी जोडणारे आरसीएस मार्ग बेळगाव, भोपाळ, गोवा, हिंडन, हैदराबाद आणि पुणे या निवडकांना पुरस्कार देण्यात आला.

आरसीएस-उडान अंतर्गत एअरलाइन ऑपरेटर मेसर्स घोडावत यांनी आरसीएस उड्डाणे सुरू केली. मात्र नाशिक ते बेळगाव प्रवासी वाहतूक सेवा मागणी आणि कमी प्रवाशांमुळे बंद करण्यात आलेली आहे. ही सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जानेवारी 2023 पासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे.

कोविडमुळे एक वर्षाची मुदत
स्पाइसजेटद्वारे नाशिक ते हैदराबादला सेवा सुरू आहे. व्हीजीएफ शिवाय 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कार्यकाळ पूर्ण करणार्‍या सर्व उडान मार्गांसाठी आरसीएस मार्ग किंवा नेटवर्कच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कालावधीचा अतिरिक्त एक वर्षाचा विस्तार, आधीच अनुकूल मानले गेले होते. अलायन्स एअरने 1 फेब—ुवारी 2019 रोजी नाशिक ते अहमदाबाद आणि हैदराबाद आणि 27 ऑक्टोबर 2019 रोजी नाशिक ते पुणे आरसीएस उड्डाणे सुरू केली आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. मात्र, कोविडमुळे ते ऑपरेट करू शकले नाहीत. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचेही केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post नाशिक-बेळगाव विमानसेवा जानेवारीपासून appeared first on पुढारी.

Exit mobile version