नाशिक-बेळगाव विमानसेवेला हिरवा झेंडा; गोवा, कोल्हापूर अवघ्या दिड तासात 

नाशिक : दक्षिण भारताला हवाई सेवेने जोडणाऱ्या नाशिक-बेळगाव विमानसेवेला आज हिरवा कंदील दाखविण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यवसाय, पर्यटनाच्या दृष्टीने हवाई सेवा महत्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगितले. 

बेंगलुरूच्या स्टार एअर कंपनीच्या वतीने दुसऱ्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून उडान योजनेंतर्गत सेवा सुरु करण्यात आली आहे. बेंगुलुरु पाठोपाठ दक्षिण भारताला जोडणारी दुसरी सेवा बेळगावच्या माध्यमातून सुरु झाल्याने नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे. खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, स्टार ग्रुपचे संजय घोडावत, स्टार एअरचे सीईओ सिमरनसिंग तिवाना, मनिष रावल आदी यावेळी उपस्थित होते.

विमानसेवेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हीटी वाढेल

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले,  उद्योग-व्यवसाय, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकचे महत्व वाढतं आहे. त्यामुळे बेळगावसह कोल्हापूर, गोवा या महत्वाच्या शहरांसाठी सेवा महत्वाची ठरेल. स्टार एअरच्या उड्डाण सेवेमुळे नाशिक, शिर्डीला पोहोचणे सोईचे होणार आहे. दीड तासांच्या अंतरात कोल्हापूर, गोवा व हुबळीला भेट देणे शक्य झाले आहे. विमानसेवेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हीटी वाढेल. स्टार एअरचे संचालक श्रेणिक घोडावत म्हणाले, नव्या विमानसेवेमुळे बेळगाव येथील व्यापार-उदीम व पर्यटन वाढीला चालना मिळेल. घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये नाशिकचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे विमानसेवेमुळे औद्योगिकतेला चालना मिळेल. स्टार एअरचे सीईओ सिमरनसिंग तिवाना म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित व्हॉट्सॲप चॅटबोट सेवेची सुरुवात होत असताना या माध्यमातून प्रवाशांना तत्काळ सेवा उपलब्ध होणार आहे. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच

अशी असेल सेवा 

नाशिक ते बेळगाव दरम्यान सोमवार, शुक्रवार व रविवार असे तीन दिवस ओझर विमानतळावरून हवाई सेवा असेल. प्रारंभी सवलतीच्या १,९९९ या सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टार एअर च्या अहमदाबाद, अजमेर (किशनगड), बेळगाव, बेंगळुरू, दिल्ली (हिंडन), हुबळी, तिरुपती, इंदूर, कलबुर्गी, मुंबई व सुरत अशा दहा शहरांसाठी उड्डाण होते. गेल्या दोन वर्षात एक लाख साठ हजार प्रवाशांना सेवेचा लाभ घेतला आहे. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या