Site icon

नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीणच्या हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून, अपघाती मृत्यूंचेही प्रमाण जास्त आहे. वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळे अपघात वाढत चालल्याने ग्रामीण पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष दंडात्मक मोहीम सुरू केली आहे. तालुकानिहाय ही कारवाई सुरू झाली आहे. वाहतूक नियम मोडणार्‍यांवर वचक निर्माण होत असून, पोलिसांनी आठवडाभरात तब्बल 11 लाखांचा दंड वसूल केला आहे

जिल्ह्यातून राष्ट्रीय व राज्य महामार्ग जात असून, त्यावरून अवजड वाहतूकही होते. प्रशस्त रस्ते असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. त्यातच काही वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याने अपघात होत असल्याचे आढळून आले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी वाहतूक शाखेच्या अधिकारी, अंमलदारांची बैठक घेतली. जिल्ह्यात झालेल्या प्राणांतिक अपघातांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियोजनासोबत बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन मोहिमेसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून, त्यात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे, सहायक निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक दगू सोनवणे यांच्यासह 70 अंमलदारांचा समावेश आहे. या पथकामार्फत बेकायदेशीरपणे व बेशिस्तपणे वाहन चालविणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. यात प्रामुख्याने वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे, रस्ते दुभाजक तोडून वाहन चालवणारे, मोबाइलचा वापर करीत वाहन चालवणारे, सीटबेल्ट-हेल्मेटचा वापर न करणारे, लेनकटिंग करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या 56 वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम-66/192अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाहतूक नियम मोडणार्‍या दोन हजार 233 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांना 10 लाख 96 हजार 650 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेकांना दणका बसला असून, कारवाई टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बेशिस्त चालकांना अकरा लाखांचा दंड appeared first on पुढारी.

Exit mobile version