नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे

ट्रॅक्‍टर चोरी प्रकरण

निफाड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यातील विंचूर वाईन पार्क ते बोकडदरे घरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकीमधील डॉक्टरचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवीत चारचाकीसह एटीएम कार्ड आणि रोख रक्कम यांची लूट करण्याचा प्रकार घडलेला होता. या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती नुसार, दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे चारचाकीमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन आरोपींनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना मारहाण व दमदाटी केली, त्यांचे खिशातील पैसे, एटीएम कार्ड, मोबाईल फोन जबरीने काढून घेवून, एटीएम कार्डव्दारे त्यांचे बँक खात्यातील रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचेच शर्टाने त्यांचे हातपाय बांधून बोळा कोंबून निर्जनस्थळी सोडून देवून त्यांची अल्टो कार तसेच सुमारे २ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेल्याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निफाड तालुक्यातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर हा पिस्तुलाचा धाक दाखवित लूटमारीच्या प्रकार घडल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस खात्याने या घटनेची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांनी सदर घटनेचा आढाव घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास वरील गुन्हा उघडकीस आणणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी बारकाईने तपास करीत संशयितांचा माग काढण्यात यश मिळवले.

सदर गुन्हा हा नैताळे येथील कुख्यात गुन्हेगार श्रावण पिंपळे व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बीड जिल्हयातील आष्टी व नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात दोन दिवस सापळा रचून स्थानिक पोलीसांचे मदतीने श्रावण उर्फ श्रावण्या सुरेश पिंपळे, रा. नैताळे तसेच त्याचे साथीदार नितिश मधुकर हिवाळे (रा. जि. जालना) आणि सचिन शिवाजी दाभाडे (रा. हरसुल, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.

सदर आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लासलगाव पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.

The post नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे appeared first on पुढारी.