Site icon

नाशिक : बोरी आंबेदरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
बोरी आंबेदरी कालवा नूतनीकरणांतर्गत जलवाहिनी बंदिस्तीकरणाचे काम तातडीने बंद करावे, या मागणीसाठी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी दहिदी ते टिंगरी पाटचारीवर सोमवार (दि.7)पासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले आहे.

बोरी आंबेदरी कालव्यासाठी शेतकर्‍यांनी सन 1992 मध्ये जमिनी दिल्या. त्यातूनच हा कालवा गेला आहे. तरी या कालव्यामुळे दहिदी, वनपट, टिंगरी, राजमाने येथील शेतकर्‍यांचे सुमारे 910 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या हजारो शेतकर्‍यांसाठी हा कालवा संजीवनी ठरला आहे. पाण्याचे महत्त्व जाणूनच या शेतकर्‍यांनी कालव्यासाठी ही जमीन दिली होती. मोठे पाइप टाकण्याचा संबंध नव्हता. असे असताना कालव्याचे पाणी हे पाटचारीने न नेता ते पाइपद्वारे नेणारी योजना शासनाने मंजूर केली. त्यामुळे या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे या कामाच्या विरोधात वारंवार लेखी अर्ज विनंती करूनही शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लाभाधारक शेतकर्‍यांनी केला आहे. योजनेनुसार कालव्याचे रूपांतर पाइपलाइनमध्ये होऊन हा परिसर ओसाड होईल. पहिलेच उपरोक्त चारही गावे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई सोसतात. आणि आता प्रकल्प पूर्ण झाल्यास चारही गावांतील 80 टक्के शेतकरी उद्ध्वस्त होतील, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करत आहेत. संबंधित विभागाने ही योजना त्वरित बंद करावी, या मागणीसाठी शेतकरी सोमवारपासून धरणे आंदोलनास बसले. त्यांना समाधान कचवे, भूषण कचवे, मालेगाव विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, देवा पाटील, शिवाजी भामरे, सुनील निकम, मधुकर शिंदे, शांताराम जाधव, दमयंती शिंदे, संगीता शालीकर, सरला निकम, अरुणा शिंदे, सरला शिंदे, मंगला निकम आदी शेतकर्‍यांनी पाठिंबा दिला आहे.

आंदोलकांना पोलिसांची नोटीस…
दरम्यान, मालेगाव तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना 149 ची नोटीस बजावली. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तत्काळ मागे घ्यावे, असे नोटिसीत म्हटले आहे. तरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून, लाभक्षेत्रातील शेतकरी सहकुटुंब त्यात सहभागी होत आहेत. आंदोलनस्थळी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बोरी आंबेदरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे appeared first on पुढारी.

Exit mobile version