नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार

बोलेरो धडक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद रोडवरून भरधाव जाणार्‍या बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अपघातानंतर पळून जाणार्‍या जीपचालकाला नागरिकांच्या मदतीने पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

मखमलाबाद रोडवरील मरिमाता मंदिराजवळील साईराम कॉम्प्लेक्स येथे राहणारा साई मोहन देशमुख (14) हा बुधवारी सायंकाळी 6 वाजता क्लास सुटल्यानंतर सायकलने घराकडे जात होता. त्यावेळी मखमलाबाद रोडवरील विठ्ठल-रुख्मिणी मंगल कार्यालयासमोर भरधाव आलेल्या बोलेरो जीपने (एमएच 39 जे 3414) साईच्या सायकलला जबर धडक दिली. यात साईच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. साईच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण, चुलत भाऊ, आजी असा परिवार आहे. साईचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. या प्रकरणी नांदगाव येथील चालक सम्राट चंद्रकांत पगारे याच्यावर पंचवटी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बोलेरोच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थी ठार appeared first on पुढारी.