नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

लग्न,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे.

पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ओळखीचा फायदा घेत दि. 4 एप्रिल 2019 ते दि. 18 मे 2023 या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, यादरम्यान पंकज कदम याचा राहाता येथील उच्चशिक्षित मुलीशी विवाह ठरला. (दि.21) नवरदेव वऱ्हाडी मंडळींसह राहाता येथे दाखल झाला होता. विवाह सोहळ्याची तयारीही झाली होती. डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूकही निघाली. याच दरम्यान, फिर्यादी पीडित महिलेने लग्नस्थळी दाखल होत आमचे प्रेमसंबंध असून, लग्नाचे आमिष दाखवून पंकज कदम याने अनेकदा लैंगिक अत्याचार केले व माझी फसवणूक केली, अशी तक्रार राहाता पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत नवरदेव पंकजला ताब्यात घेतले. अक्षतारूपी आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच पंकजला राहाता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लग्नासाठी आलेल्या वधू- वरांकडील वऱ्हाडींमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला थेट पोलीस ठाण्यात नेले. बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागल्याची वेळ आल्याने वऱ्हाडी मंडळींचा हिरमोड झाला. या प्रकरणी प्रथम राहाता पोलीस ठाण्यात महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंकज याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तो नाशिकरोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.