नाशिक : ब्रह्मगिरी-अंजनेरी ‘रोप-वे’ला वेग

रोप वे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यात नाशिकसह पुण्यातील राजगड व रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि महाडमध्ये ‘रोप-वे’ प्रस्तावित आहेत. ब्रह्मगिरी ते अंजनेरी पर्वत या ५.८ किलोमीटरच्या ‘रोप-वे’साठी गेल्या वर्षी सर्वेक्षण झाले होते. मात्र, ग्रामस्थांसह पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे ‘रोप-वे’च्या कामाला ब्रेक लागला होता. आता पुन्हा ‘रोप-वे’च्या हालचालींनी वेग घेतला असून, राष्ट्रीय राजमार्ग रसद प्रबंधन लिमिटेडने (एनएचएलएमएल) प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

राज्यातील चारही ‘रोप-वे’चा केंद्राच्या पर्वतमालांचा योजनेत समावेश केला असून, सुमारे १ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ब्रह्मगिरी-अंजनेरी रोप-वेसाठी राज्य शासनाशी चर्चा करून निर्णय घेतल्याचा दावा ‘एनएचएलएमएल’ने केला आहे. त्यासाठी अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच निविदा निर्गमित होण्याची शक्यता आहे. ‘हायब्रीड अॅन्युइटी मोड’वर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे दोन वर्षे कामकाज सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांचा ब्रह्मगिरी-अंजनेरी पर्वत ‘रोप-वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्रातील डोंगरावरून ते थेट ब्रह्मगिरी पर्वतापर्यंत जाण्यासाठी रोप-वे प्रकल्प केंद्राच्या योजनेंतर्गत प्रस्तावित केला आहे. खा. गोडसे ‘रोपे-वे’साठी आग्रही असून, त्यांचा सर्वच पातळींवर पाठपुरावा सुरू आहे. डीपीआर निर्मितीमुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वनविभागाला प्रस्तावाची प्रतीक्षा

ब्रह्मगिरी-अंजनेरी ‘रोप-वे’मुळे जैवविविधता धोक्यात येणार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. तर ‘रोप-वे’संदर्भात अद्याप कोणताही लेखी प्रस्ताव अथवा जागा हस्तांतरणासंदर्भात मागणी झालेली नाही. प्रस्ताव आल्यास तो नागपूर मुख्यालय आणि वन मंत्रालयाकडे पाठविण्याचा सोपस्कार पार पाडला जाईल, असे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : ब्रह्मगिरी-अंजनेरी 'रोप-वे'ला वेग appeared first on पुढारी.