Site icon

नाशिक : भऊर बॅंक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील खातेदारांचे पालकमंत्र्यांना साकडे

देवळा : भऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील कथित गैर व्यवहार प्रकरणी अजूनही अनेकांना न्याय मिळाला नसून, फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे निवेदन सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांना (दि. २२) रोजी देण्यात आले.

बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेतील अपहार प्रकरणातील फसवणूक झालेल्या पहिल्या टप्प्यातील ३९ खातेदारांचे १ कोटी ९१ लाख ८२ हजार रुपये गेल्या तीन महिन्यांपूर्वी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या पुढाकारातून व्याजासह जमा करण्यात आले. मात्र उर्वरित २०३ ग्राहकांना अद्याप न्याय मिळाला नाही. यामुळे हे खातेदार संभ्रमात पडले आहेत. यासाठी शिष्टमंडळाने बुधवारी (दि. २२) रोजी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. कथित गैर व्यवहार प्रकरणी या शाखेतील खातेदार शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून, यात फसवणूक झालेल्या अनेकांना अद्याप त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत.

बँकेतील मुद्दत ठेवी व पिक कर्ज प्रकरणे व आर्थिक व्यवहारात शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात फसवणूक झालेली आहे. त्या शेतकऱ्यांच्या झालेल्या व्यवहाराची सविस्तर चौकशी करून बँकेवर योग्य ती कार्यवाही करावी. व या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच बँकेत अडकलेले पैसे ग्राहकांना त्वरित मिळवून बँकेतील खातेदारांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भऊरचे पोलिस पाटील भरत पवार, तसेच जितेंद्र आहेर, आण्णा पवार, सत्यम आहेर, जाधव सर, नंदु पवार, साहेबराव पवार, भाऊसाहेब पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : भऊर बॅंक ऑफ महाराष्ट्र अपहार प्रकरणातील खातेदारांचे पालकमंत्र्यांना साकडे appeared first on पुढारी.

Exit mobile version