मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : मालेगाव-नामपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या कार्यालयात शिरलेल्या बिबट्याला दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकार्यांना यश आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. भरवस्तीत बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा असा अंदाज नागरिकांतून लावण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
- Share Market Closing Bell | चार सत्रांतील तेजीला ब्रेक! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; नेमके कारण काय?
- Shahrukh-Ram charan : ‘इडली वडा राम चरण कहां है तू’ शाहरुखच्या वादग्रस्त कॉमेंटवर मेकअप आर्टिस्टने सोडली पार्टी
- प्रा जी. एन. साईबाबा यांच्यासह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता
शहरातील मालेगाव-नामपूर रस्त्यावर साई सेलिब्रेशन हॉल आहे. त्याला लागूनच कार्यालय व इतर गाळे आहेत. याच कार्यालयातील रखवालदार विजय अहिरे यांचा मुलगा मोहीत अहिरे ( वय १३) हा कार्यालयात मोबाईल पहात बसलेला होता. सकाळची वेळ असल्याने सर्व गाळे बंद होते. फक्त कार्यालय उघडे होते. अचानक बिबट्या डरकाळ्या फोडत मोहितच्या जवळून कार्यालयाच्या आतमध्ये शिरला. मोहितने त्याला न घाबरता हळूच उठून बाहेरून दरवाजा बंद करून कार्यालयाबाहेर धूम ठोकली.
त्यानंतर त्याने वडिलांना बिबट्याला कार्यालयात बंद केल्याची माहिती दिली. त्यांनी कार्यालयाच्या संचालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले. नाशिक येथील रेस्न्यु पथकाला ही यासंदर्भात माहिती देण्यात आली. कार्यालयात बिबट्या कोंडल्याची माहिती मिळताच नागरिकांनी खूपच गर्दी केली. यावेळी मालेगाव वनविभाग व महापालिकेच्या अग्निशमन दलासह पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीसांनी गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.
नाशिक येथील रेस्न्यू पथक १०.३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. या पथकातील डॉ. मनोहर नागरे, वैभव उगले यांच्यासह मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे, अग्निशमन दलाचे संजय पवार यांच्यासह पोलीस अधिकार्यांनी बिबट्या असलेल्या परिसराची पाहणी केली. यानंतर कार्यालयातील बंद असलेल्या दरवाजाबाहेर पिंजरा असलेले वाहन उभे करण्यात आले. यावेळी कार्यालयातील उघड्या खिडकीतून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुध्द केले. त्यानंतर काही वेळाने वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी बेशुध्द असलेल्या बिबट्याला उचलून सुखरुप पिंजर्यामध्ये सुरक्षितरित्या जेरबंद केले. हा बिबट्या साधारणपणे ३ ते ४ वर्षाचा असून तो नर जातीचा आहे. मोहितमुळे बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्याला जेरबंद करुन वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तो तंदुरस्त झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडले जाणार आहे.
– वैभव हिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मालेगाव
The post नाशिक : भरवस्तीत पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.