नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव

मल्हारगड www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
भाक्षी येथील श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.6) पासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जय मल्हार युवक मित्र मंडळातर्फे देण्यात आली आहे. जेजुरी व चंदनपुरीप्रमाणेच भाक्षी येथील खंडोबालाही मोठे महत्व आहे. गुरुवारी (दि.5) सायंकाळी देवाच्या मानाच्या काठीची (ध्वजाची) गावातून सवाद्य मिरवणूक काढून तिची विधिवत उभारणी झाली. तर शुक्रवारी सकाळी खंडोबाची महापूजा होईल. शनिवारी (दि.7) रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तर सोमवारी (दि.9) दुपारी एक वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे. मोफत तमाशा आणि कुस्त्यांची दंगल हे पंचक्रोशीतील भाविकांचे आकर्षण ठरत असते. जय मल्हार यात्रोत्सव समितीने भक्तांना सुविधा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मल्हार गडावरील मंदिरासमोर प्रशस्त सभा मंडप बांधण्यात आला आहे. आकर्षक अशी रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई ही केली आहे. भक्तांना सहजपणे खंडोबाचे दर्शन घेता यावे आणि दर्शन रांगेतील गर्दी नियंत्रणात राहावी या करिता रोलिंगची संख्या वाढविण्यात येऊन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विभाग केले आहेत. यात्रा काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास समितीने जनरेटरची सुविधाही केलेली आहे. पुढील वर्षी सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय सेवाही कार्यान्वित केली जाणार असल्याचे समितीने सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : भाक्षीच्या मल्हार गडावर आजपासून यात्रोत्सव appeared first on पुढारी.