नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द

CM of Maharashtra Eknath Shinde

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकशी संबंधित विकासकामे, प्रकल्प तसेच प्रस्तावांबाबत शुक्रवारी (दि. 4) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीला भाजपच्या आमदारांनाच वगळण्यात आल्याची बाब समोर आली आणि त्यातून भाजपची नाराजी नको, यामुळेच मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐनवेळी विशेष बैठक रद्द केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही बाब मुख्यमंत्र्यांकडून संबंधितांना एकप्रकारची चपराकच म्हणावी लागेल.

गेल्या गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून घरपट्टी, गावठाण क्लस्टर, रस्ते काँक्रिटीकरण, सिंहस्थ आराखडा, नमामि गोदा प्रकल्प, एसआरए योजना, सर्वांसाठी घर, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कामे अशा अनेक मुद्दे व विषयांवर चर्चा झाली. मनपातील भरती प्रक्रियेसंदर्भात लेखा, प्रशासन आणि तांत्रिक या तीन संवर्गांशी संबंधित सेवा प्रवेश नियमावलीबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्याची सूचना ना. भुसे यांनी केली. या बैठकीपाठोपाठ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी लगेचच दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि. 4) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकशी संबंधित सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही कॅमरे बसविणे, बांधकाम परवानगी ऑफलाइन करणे अशा मुद्द्यांवर विशेष बैठक होणार असल्याचे कळविले होते. परंतु, या बैठकीला सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या शहरातील तीनपैकी एकाही आमदाराला बोलाविलेले नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याने तसेच संबंधित आमदारांनीही याबाबत आपल्या पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट बैठकच रद्द केली. त्यामुळे शिंदे यांनी एकप्रकारे आपल्या गटातील संबंधितांना चपराक लगावली असून, यापुढील काळात असा प्रकार न करण्याबाबत समजही दिल्याचे समजते. कारण यापूर्वीदेखील नाशिकमध्ये झालेल्या बैठकांना शिंदे गटाकडून भाजप पदाधिकारी व आमदारांना न बोलाविल्याची नाराजी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठांपर्यंत गेली होती. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडल्याने 4 नोव्हेंबरला मंत्रालयात बोलाविलेली बैठकच मुख्यमंत्र्यांनी रद्द केली.

निवडणुकांसाठीच खटाटोप…
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेच शिंदे गट आणि भाजप यांच्यात नाशिक शहरातील विकासकामे, विविध प्रकल्प तसेच सिंहस्थ कुंभेमेळ्याचे नियोजन आणि आराखडा या बाबी हायजॅक करण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यात शिंदे गटाकडे पालकमंत्रिपद असल्याने शिंदे गट आधीच वरचढ ठरत आहे. त्यात सिंहस्थाच्या आराखड्यात आपलीच छाप कशी उमटून दिसेल, यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात असल्याने भाजपकडून आता उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच आढावा बैठक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : भाजप आमदारांच्या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विशेष बैठक रद्द appeared first on पुढारी.