नाशिक : भावलीपाठोपाठ भाम धरणही फुल

भाम धरण,www.pudhari.news

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने दारणा धरण समूहाच्या धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. या जोरदार पावसामुळे भावलीपाठोपाठ आता भाम धरणही ओसंडून वाहू लागले आहे.

तालुक्यात नव्यानेच पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून बांधलेल्या या भाम धरणाची क्षमता सुमारे पावणेतीन टीमसी असून, सलग पाचव्या वर्षीही हे धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे धरण भरण्यास जवळपास 15 दिवस उशीर झाला, तरीही धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. नांदूरमधमेश्वर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या दारणा धरण समूहात दारणा, भावली, वाकी, भाम या धरणांच्या पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे या धरणांच्या जलसाठ्याकडे शासनाचे विशेष लक्ष असते. इगतपुरी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सतत सुरू असलेला संततधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विशेषत: पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा धरण भरल्यात जमा आहे. 10 दिवसांपूर्वीच भावली धरण भरले. त्यात शुक्रवारी (दि. 4) पहाटे भाम धरणही ओव्हरफ्लो झाल्याने दारणा नदीपात्र खळखळून वाहात आहे. भाम, भावली, वाकी या नद्यांचे पाणी दारणा धरणात समाविष्ट होत असल्याने दारणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाम धरण हे इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते खोऱ्यात निर्माण झाले असून, पाच वर्षांपूर्वीच या धरणाचे काम पूर्ण झाले. सलग पाचव्या वर्षीही हे धरण जलदगतीने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : भावलीपाठोपाठ भाम धरणही फुल appeared first on पुढारी.