नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत

डॉक्टर www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
आजच्या स्वार्थी राजकारणाचा चेहरामोहरा पाहिल्यानंतर खरेच लोकप्रतिनिधींकडे मदत मागावी की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. पण याला अपवाद ठरले आहेत चांदवड – देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर. एका गरजू विद्यार्थ्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याच्या डॉक्टरकीचा प्रवेशातील अडसर दूर केला आहे.

पिंपळगाव बसवंतच्या पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा अक्षय दत्तात्रेय आहेर हा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट प्रवेश परीक्षा तब्बल 620 गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्याला मुंबईच्या नायर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. पण सोन्याला जशी झळाळी मिळविण्यासाठी अग्नीतून तावूनसुलाखून परीक्षा द्यावी लागते, त्याचप्रमाणे अक्षयबाबतही घडले. ऐन प्रवेशाच्या आदल्या दिवशी जातीचा दाखला हरविल्याचे अक्षयच्या लक्षात आले आणि एकच तारांबळ उडाली. अक्षयने सर्व शोधाशोध करून झाल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे यांच्या निदर्शनास हा प्रसंग आणून दिला. अनारसे यांनी आ. डॉ. राहुल आहेर यांच्याशी तत्काळ संपर्क साधत एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा फक्त एका कागदावाचून प्रवेश रद्द होऊ शकतो, ही बाब लक्षात आणून दिली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांनी तत्काळ चांदवडच्या प्रांतांशी संपर्क साधत त्यांना अक्षयला रात्रीतून जातीचा दाखला मिळावा, यासाठी सूचना केल्या. प्रांतांनीही दिरंगाई न करता, रात्रीतून अक्षयला जातीचा दाखला उपलब्ध करून दिला आणि अक्षयचा प्रवेश निश्चित झाला. पण एवढ्यावरच न थांबता आमदारांनी अक्षयच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अक्षयच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी थेट तो राहात असलेल्या वस्तीवर गेले. त्यांनी महाविद्यालयाच्या अक्षय आहेर आणि तसेच याच परीक्षेत यश मिळविणार्‍या सुयश शिंदे या दोघांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल अनारसे, प्राचार्य भंडारे, उपप्राचार्य योगेश्वर शिरसाट, प्रा. मीनाक्षी जाधव यांनीही आमदारांचा सत्कार केला.

हेही वाचा:

The post नाशिक : भावी डॉक्टरला आमदारांची अशीही मदत appeared first on पुढारी.