Site icon

नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं?

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
बाजार समिती तसेच किरकोळ बाजारात कांद्यापाठोपाठ जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या भावात मोठी घसरण झाली. सर्वांत मोठी घसरण मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटोची झाली आहे. मेथीला शेकडा 100 ते 250 रुपये, कोथिंबीरला शेकडा 150 ते 200 रुपये, तर टोमॅटोला प्रतिक्विंटल 600 इतकाच भाव मिळत आहे. परिणामी, कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे त्यातून वाहतुकीवर केलेला खर्च निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं? असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

पावसाळ्यात सलग आणि दमदार पावसामुळे नदी-नाले, ओढे यांना अनेकदा पूर आले होते, तर छोटे-मोठे बंधारे, धरण, शेततळे तुडुंब भरलेले असून, विहिरींतदेखील चांगले पाणी उतरले आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्याने शेतकर्‍यांनी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे यंदा सर्वच भाजीपाल्याची आवक वाढली. आवक वाढताच भावात मोठी घसरण सुरू झाली. सर्वांत जास्त फटका मेथी, शेपू, पालक आणि कोथिंबीरला बसला. मेथी, पालक, शेपूची एक जुडी एक ते अडीच रुपये, तर कोथिंबिरीच्या तीन जुड्या 10 रुपयालादेखील कोणी घ्यायला तयार नसून टोमॅटोला प्रतिकिलो सहा रुपये भाव मिळत आहे. सध्या बाजार समिती असो अथवा भाजीपाला बाजार असो अशा सर्व ठिकाणी बटाटे, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगे, मेथी, भेंडी, गवार, गिलके, भोपळा यासह इतर सर्वच भाजीपाल्यांचे भाव कोसळल्याचे चित्र आहे. एकीकडे सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडरपासून मोबाइल, टीव्हीचे रिचार्ज आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना फक्त शेतमालालाच भाव मिळत नाही. कॅम्प भागात राहणारे सुरेश कातकाडे या शेतकर्‍याने एक एकरात मेथीचे पीक घेण्यासाठी लागणारे खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तब्बल दहा ते बारा हजार रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट केले.

मेथीचे बिघडले अर्थकारण
बियाणे                        8000
खते                           3200
औषधे                       3000
मजुरी                       4000
पाणी                        3600
सुतळी                       800
वाहतूक                    2400
एकूण                      25,000

5,500 एका एकरात जुड्या तर 12,000 नुसार होणारे नुकसान यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : भाव कोसळले; शेतकर्‍यांचा सवाल : तुम्ही सांगा मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं? appeared first on पुढारी.

Exit mobile version