नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव…

बिबट्याचा हल्ला,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या महिन्यात म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर पाचवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.7) मध्यरात्री याच परिसरातील मोरे वस्तीवर अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यात ओढत नेत असलेल्या बिबट्यावर लोखंडी फुंकणीचा प्रहार करून युवकाने बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवला. मध्यरात्रीच्या सुमारास रंगलेल्या या थरारामध्ये युवकाच्या डाव्या हाताला बिबट्याचे दात लागले आहेत.

म्हसरूळ येथील मोराडे इस्टेट भागात शेतकर्‍यांच्या अनेक वस्त्या आहेत. याच ठिकाणी मोरे कुटुंबीयांची शेती आहे. ही शेती बंडू थाळकर कुटुंब सांभाळत असून, त्यांचे जवळपास 20 ते 22 जणांचे कुटुंब तेथे वास्तव्यास आहे. यातील काही सदस्य शेतमजूर म्हणून काम करतात, तर काही खासगी कंपनीत काम करतात. या कुटुंबातील जवळपास 10 ते 12 सदस्य हे नेहमीप्रमाणे घराबाहेर अंगणात झोपलेले असताना रविवारी रात्री 12 ते 12.30च्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने भारत बंडू थाळकर (40) यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भारत यांच्या हाताला धरून बिबट्या ओढत घेऊन चाललेला असताना इतर सदस्यही जागे झाले व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी भारत यांनी दुसर्‍या हाताने अंगणातील चुलीजवळील लोखंडी फुंकणीने बिबट्यावर प्रहार केला. आरडाओरडा आणि फुंकणीच्या प्रहारामुळे बिबट्याने शेतात धूम ठोकली. या हल्ल्यात भारत यांच्या डाव्या हाताला बिबट्याचे तीन ते चार दात लागले असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, उपवनसंरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, वाहनचालक अशोक खांजोळे यांनी हल्ला झालेले ठिकाण व परिसराची पाहणी केली.

वनपाल उत्तम पाटील यांनी जखमी भारत यास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सुदैवाने भारत थाळकर यांची प्रकृती स्थिर आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळापासून काही अंतरावरील नाल्यालगत पिंजरा लावला आहे.

आमदारांची घटनास्थळी भेट
मोराडे इस्टेट येथे बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळताच पूर्व विधानसभा आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी घटनास्थळी भेट देत जखमी भारत थाळकर यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत रंगनाथ मोरे, सोमनाथ वडजे, टिंकू मोराडे, महेंद्र मोराडे, रुंजा मोराडे, अनिल मोराडे, शुभम मोराडे आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मध्यरात्री अंगणात झोपलेल्या युवकावर बिबट्याचा हल्ला, हिमतीने वाचविला जीव... appeared first on पुढारी.