
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देश दिल्यानुसार नाशिक महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मोहिमेतील पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर आणि दुस-या टप्प्यात १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
शासन आदेशानुसार पुन्हा एकदा सर्व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा मनपा मुख्यालयात १२ डिसेंबर रोजी पार पडली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश नांदापूरकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश नांदापूरकर आणि माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी शहरी प्राथमिक केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविका यांना विशेष मोहीम काळात १०० टक्के लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेत मनपा क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. नऊ महिने ते पाच वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात येणार आहे.
ग्रामीण, शहरी आणि महापालिका क्षेत्रात या विशेष लसीकरण मोहिमेत वंचित राहिलेल्या बालकांना लस दिली जाणार आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे. तसेच या विशेष मोहिमेत ज्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना नियमित जीवनसत्व ‘अ’ चा डोस दिला गेला नसेल त्या सर्व बालकांना जीवनसत्त्व ‘अ’चा डोस देण्यात यावा, असे निर्देशित केले आहे.
बालरोग तज्ज्ञांचाही सहभाग
या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशी सूचना आहे. नाशिक शहरातील पालकांनी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, सर्वेक्षणाला येणा-या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
हेही वाचा :
- लोणी : 34 कोटी नुकसान भरपाई बँकेत वर्ग : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे
- संगमनेर : 18 ग्रा.पं, 75 सदस्य बिनविरोध! डोळासने, सायखिंडीचे सरपंच बिनविरोध
- Marine Commandos :नौदलाच्या सर्वांत घातक मार्कोस कमांडो दलात होणार लढवय्या महिलांचा समावेश
The post नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम appeared first on पुढारी.