Site icon

नाशिक : मनपाचा आयटी विभाग कंत्राटी अभियंत्यांच्या हाती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अमेरिकन हॅकर्सने काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या संकेतस्थळावर हल्ला चढवत संपूर्ण डेटा चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनपाच्या संगणक विभागाने हा हल्ला परतवून लावला. मात्र, भविष्यातील अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी मनपाकडून पुरेशी खबरदारी घेतली जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कारण मनपाच्या आयटी विभागाचा संपूर्ण कारभार मानधनावर नेमलेल्या दोन अभियंत्यांसह आउटसोर्सिंग पद्धतीने नेमलेल्या संस्थेच्या हाती आहे.

महापालिका हद्दीतील नागरिकांसह मनपाचे कर्मचारी तसेच मनपाच्या नगररचना, बांधकाम, अर्थ व लेखा, वैद्यकीय, लेखापरीक्षण यासह जवळपास 43 विभागांशी संबंधित महत्त्वाचा डेटा संगणक विभागाकडे आहे. यामुळे ही सर्वच माहिती महापालिकेच्या सुरक्षितता आणि आर्थिकद़ृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. हीच माहिती चोरी करण्याच्या द़ृष्टीने संपूर्ण संगणक यंत्रणा ठप्प करण्याचा अमेरिकन हॅकर्सने प्रयत्न केला. दोन आठवड्यांपूर्वी असा प्रकार घडला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सायबर विभागात तक्रार दाखल केली आहे. मनपाच्या आयटी सेलच्या फायर वॉलवर टकटक करून हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र, आयटी विभागाने हा हल्ला परतवून लावल्याने संभाव्य हानी टळली आहे. आयटी विभागामार्फत मनपाच्या विविध विभागांचा कारभार संगणकामार्फत चालविला जातो. यामुळे ही सर्वच माहिती मनपा आणि शहराच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ग्लोबल आयपी अ‍ॅड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हॅकर्सने मनपाच्या संगणक यंत्रणेत बिघाड करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली. यामुळे भविष्यात अशा स्वरूपाचे हल्ले झाले तर त्यास तोंड देण्यासाठी मनपाकडून काय काय उपाययोजना केल्या जातात हे महत्त्वाचे आहे. अमेरिकन हॅकर्सच्या हल्ल्यानंतर संगणक विभागाने अ‍ॅण्टिव्हायरस अपडेट करून घेतले आहेत. तसेच फायरवॉल असल्याने होणारे धोके निदर्शनास येतात. संगणक यंत्रणा चालविण्यासाठी मनपाकडे कायमस्वरूपी तज्ज्ञ अभियंते तसेच कर्मचारी नाहीत. यामुळे मानधनावर नेमलेले दोन अभियंते आणि एका खासगी संस्थेच्या हाती संगणक विभागाची देखभाल, दुरुस्ती सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनपाचा आयटी विभाग कंत्राटी अभियंत्यांच्या हाती appeared first on पुढारी.

Exit mobile version