नाशिक : मनपाचा पाणीपट्टी अ‍ॅपचा प्रयोग फसला, ‘इतक्या’ लोकांनीच डाउनलोड केले अ‍ॅप

पाणीपट्टी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाणीपट्टीचे देयक मुदतीत अन् एका क्लिकवर नळजोडणीधारकांना मिळावे या उदात्त हेतूने मनपाने काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन अ‍ॅप आणले होते. या अ‍ॅपचा नळजोडणीधारकांना मोठा लाभ होईल, असेही सांगितले गेले. परंतु, गेल्या दीड महिन्यात अवघ्या 200 लोकांनीच हे अ‍ॅप डाउनलोड केल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या दोनशे लोकांमध्ये 75 टक्के मनपाचेच कर्मचारी आहेत. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग पूर्णतः फसला असून, आता अ‍ॅपसाठी मनपा प्रशासनाला विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

नाशिक शहराची लोकसंख्या 20 लाखांपेक्षा अधिक आहे. तसेच सव्वादोन लाख नळजोडणीधारक आहेत. अशात नळजोडणीधारकांना तत्काळ पाणीपट्टीचे देयके उपलब्ध व्हावेत, या हेतूने हे ऑनलाइन अ‍ॅप आणण्यात आले होते. दुसरी बाब म्हणजे मनपाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने, पाणीपट्टीचे देयकेही वेळेत पोहोचविले जात नव्हते. अशात थकबाकीचा डोंगर सव्वाशे कोटींवर गेला आहे. पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च अन् त्यातून मिळणारा महसूल यात तफावत असल्याने पाणीपट्टीची थकबाकी मनपा आर्थिक अडचणीत आणणारी ठरू लागल्याने, ऑनलाइन अ‍ॅपचा प्रयोग केला गेला. मनपा आयुक्त रमेश पवार व कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी ‘एनएमसी वॉटर टॅक्स’ अ‍ॅप आणले. दीड महिन्यापूर्वी हे अ‍ॅप नाशिककरांच्या सेवेतही उपलब्ध करून दिले.

या अ‍ॅपच्या माध्यमातून नळजोडणीधारकास स्वतःच्या पाणीमीटरचे छायाचित्र घेऊन ते अ‍ॅपवर डाउनलोड केल्यानंतर मनपाच्या करवसुली विभागामार्फत त्याची खात्री करून त्वरित नळजोडणीधारकास एसएमएस, ई-मेलद्वारे देयक प्राप्त होऊ शकत होते. त्यानुसार देयकाप्रमाणे नळजोडणीधारकास ई-पेमेंटद्वारे भरणा करण्याची सुविधाही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मनपाचे कर्मचारीदेखील या अ‍ॅपद्वारे नळजोडणीधारकास तत्काळ देयक अदा करू शकतात. ‘गुगल प्ले स्टोअर’वरून नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले होते. या अ‍ॅपच्या संचलनासाठी करवसुली विभागातील सव्वाशे कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. प्रशिक्षण कालावधीत सव्वाशे कर्मचारी तसेच अधिकार्‍यांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले. मात्र, दीड महिन्यानंतरही अ‍ॅप डाउनलोड करणार्‍यांचा आकडा दोनशेपर्यंतच सीमित राहिला आहे.

नागरिकांना देणार अ‍ॅपचे प्रशिक्षण
ऑनलाइन अ‍ॅपचा प्रयोग फसल्याचे दिसताच प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. या अ‍ॅपचा प्रचार आणि प्रसार होऊ शकला नसल्यानेच अ‍ॅपचा प्रयोग फसल्याचा निष्कर्ष प्रथमदर्शनी काढण्यात आला आहे. त्यामुळे आता हे अ‍ॅप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. अंतिम मतदारयाद्या प्रसिद्धीनंतर करवसुली निरीक्षकांना घरोघरी पाठवून देयक वाटप तसेच अ‍ॅपचे नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

..तर एक पट दंड ठोठावणार
या अ‍ॅपचा वापर करताना नळजोडणीधारकाने चांगल्या दर्जाचे जलमापक (पाणीमीटर) बसविणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर ते दर्शनी भागात असणेही आवश्यक आहे. जलमाफक नादुरुस्त किंवा बंद स्थितीत असल्यास ते तत्काळ दुरुस्त करायला हवे. याकरिता नळजोडणीधारकांना मनपा प्रशासनाने 30 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत जलमापक न बसविल्यास किंवा दुरुस्त न केल्यास देयकाच्या रकमेइतकाच एक पट दंड ठोठावला जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाचा पाणीपट्टी अ‍ॅपचा प्रयोग फसला, 'इतक्या' लोकांनीच डाउनलोड केले अ‍ॅप appeared first on पुढारी.