Site icon

नाशिक : मनपाच्या जलतरण तलाव सभासदांना शुल्क माफी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेचे जलतरण तलाव तब्बल दोन वर्षे बंद होते. या कालावधीतील सभासद शुल्क वसुलीचा प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर करण्यात आलेला प्रस्ताव आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेटाळून लावला आहे. सुमारे 20 लाखांच्या सभासद शुल्काला माफीचा निर्णय स्थायीच्या सभेत घेण्यात आल्याने तरण तलावांच्या तब्बल तीन हजार सभासदांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मनपाचे हक्काचे उत्पन्न बुडाले आहे.

शहरासह उपनगरांमध्ये मनपाच्या माध्यमातून नागरिकांसाठी चार जलतरण तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तरण तलावांचे 2 हजार 872 आजीव सभासद असून, त्यांच्याकडून वार्षिक प्रतिसभासद 350 रुपये देखभाल शुल्क घेतले जाते. कोरोना काळात शासनाच्या निर्देशांनुसार दोन वर्षे तरण तलाव बंद होते. कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर जलतरण तलाव पूर्ववत खुले करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना काळातील सभासद शुल्काचा प्रश्न निर्माण झाला होता. जलतरण तलाव बंद असलेल्या दोन वर्षांच्या काळातील सभासद शुल्कवसुलीचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवारी(दि.9) स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. दोन वर्षांचे प्रत्येकी 700 रुपये आजीव सभासदांकडून आकारण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. बंद काळातील शुल्कवसुली योग्य नसल्याची भावना सभासदांकडून व्यक्त केली जात होती. अखेर स्थायी समितीच्या सभेत कोरोना काळातील तरण तलावाच्या आजीव सभासद शुल्क माफीचा निर्णय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला. दरम्यान, स्थायीच्या शुल्क माफीच्या निर्णयाला नगरसचिव राजू कुटे यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या जलतरण तलाव सभासदांना शुल्क माफी appeared first on पुढारी.

Exit mobile version