Site icon

नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आनंदवली शिवारातील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या १८ गुंठेपैकी साडेदहा गुंठे जागेवर इमारतीचे बांधकाम करणाऱ्या अर्चित बिल्डर व डेव्हलपर्सला नगर रचना विभागाने दणका दिल्यानंतर संबंधित बिल्डरने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. मनपाने या इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला रोखल्यानंतर तसेच इमारत परवाना रद्दची नोटीस दिली होती. त्यानंतर बिल्डरने नमते घेत अतिक्रमण काढले आहे.

बिल्डरने स्वत:च अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने एक प्रकारे मनपाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे आता मनपाकडून बिल्डरवर काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागून आहे. आनंदवली शिवारातील भूमापन क्र. ६७ या १८ गुंठे क्षेत्रफळ असलेला भूखंड गंगापूर ग्रुपग्रामपंचायतीच्या मालकीचा होता. गंगापूर गाव नाशिक महापालिकेत विलीन झाल्यामुळे नोंद क्र. ६३११ प्रमाणे संबंधित भूखंडाला नाशिक मनपाचे नाव लागले होते. मात्र, या ठिकाणच्या जागेसाठी अर्चित बिल्डरने मनपाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत जागेवर अतिक्रमण केले. संबंधितांनी स. क्र. ६१ ब ला लागून असलेल्या मनपाच्या भूमापन क्र. ६७ ची १८ गुंठे जागा संबंधित बिल्डरची असल्याचे दाखवून मनपाकडून व्यावसायिक इमारतीचा प्लॅन मंजूर करून घेतला होता.

याबाबत राष्ट्रवादीचे अनिल चौघुले यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. मनपाची १६ कोटींची फसवणूक झाल्याचे तसेच संबंधित जागेवर पूर्णपणे व्यावसायिक बांधकाम उभे करून मनपाची जागा हडप करण्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. यावर मनपाने संबंधित बिल्डरला नोटीस बजावली होती. महापालिकेने बिल्डरला अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. तर दुसरीकडे बिल्डरने अतिक्रमण काढण्यापूर्वीच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी आटापिटा सुरू केला होता. अखेरीस मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरने स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केल्याने अतिक्रमण झाल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या दणक्यानंतर बिल्डरकडून अतिक्रमण काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Exit mobile version