नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता “ई-मुव्हमेंट’

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मीटिंग, व्हिजिटच्या नावे गायब होत असल्याचे समोर आल्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘ई-मुव्हमेंट’ प्रणाली तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कार्यालयातून विनाकारण इतरत्र भटकंती करणाऱ्यांना चाप बसणार असून, ही प्रणाली येत्या सोमवारपासून (दि.१५) लागू केली जाणार आहे.

या प्रणालीअंतर्गत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडून बाहेर जायचे असेल तर आॅनलाइन पद्धतीनेच आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी, कर्मचारी किती वेळ बाहेर होते. दिवसातून ते किती वेळा बाहेर गेले याबाबतची संपूर्ण नोंद या सॉफ्टवेअरमध्ये असणार आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीच हे सॉफ्टवेअर विकसित करण्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र, राधाकृष्ण गमे यांनी ते कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

अशी होणार नोंद

मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयीन कामासाठी बाहेर जाण्यासाठी आपल्या वरिष्ठांना या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून ‘नोट’ पाठवावी लागेल. संबंधित विभागप्रमुखाने त्यास मान्यता दिल्यानंतरच त्यांचे जाणे योग्य मानले जाईल. विभागप्रमुखांनी देखील बाहेर जाण्यासाठी कामाचे स्वरूप सांगून त्याबाबत आयुक्तांना नोट पाठवून परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगी न घेता बाहेर कोणी बाहेर पडत असेल तर त्याच्यावर कारवाईदेखील केली जाऊ शकते.

या प्रणालीच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजानिमित्त बाहेर जाताना आॅनलाइन परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. एखाद्याने प्रणालीचा वापर न केल्यास त्याच्यावर बेजबाबदार वर्तनाचा ठपका ठेवून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

– विजयकुमार मुंडे, उपआयुक्त, आयटी विभाग, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांसाठी आता "ई-मुव्हमेंट' appeared first on पुढारी.