नाशिक : मनपाच्या भूखंडावर बिल्डरचे अतिक्रमण, अधिकाऱ्यांनी असे रोखले काम

मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये महापालिकेच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर एका बिल्डरने अतिक्रमण करून वॉल कंपाउंड करत सुमारे दीड ते दोन एकर जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब माजी नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या लक्षात येताच त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावत पत्रव्यवहार करीत अतिक्रमित काम रोखले.

प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्व्हे क्रमांक ८९०/२३/१ मध्ये १०५०१ आर चौरस मीटर, अडीच एकर जागा ही क्रीडांगणासाठी आरक्षित भूखंड आहे. या भूखंडालगत अन्य रहिवासी क्षेत्र आहे. भूखंडालगत एका बिल्डरचा भूखंडदेखील आहे. मनपाच्या भूखंडावर या बिल्डरने चक्क २३ फूट रुंद तसेच १०० मीटर लांब वॉल कंपाउड बांधण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतची माहिती प्रभागाचे माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांना जागरूक नागरिकांनी लक्षात आणून दिली होती. बडोदे यांनी या जागेवर जात प्रत्यक्षात बघितले असता मनपाच्या जागेवर खुलेआम अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. बडोदे यांनी महापालिकेशी १४ जून २०२२ रोजी पत्रव्यवहार केला होता. तसेच आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती, मात्र, महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर बडोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती.

महापालिकेचा हा भूखंड क्रीडांगणासाठी आरक्षित असून, यावर तरण तलाव प्रस्तावित आहे. बिल्डरकडून पुन्हा वॉल कंपाउंडचे काम सुरू झाल्याने मंगळवारी दुपारी बडोदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अतिक्रमण होत असल्याची माहिती पुन्हा दिली. त्यानंतर बुधवारी सकाळी मनपाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या जागेचे मोजमाप करत अतिक्रमण करीत असलेल्या बिल्डरचे अनधिकृत काम बंद पाडले.

प्रभाग ३१ मध्ये क्रीडांगणासाठी आरक्षित आरक्षित भूखंडावर २३ फूट रुंद व १०० मीटर लांब असे वॉल कंपाउंड बांधण्यास बिल्डरने सुरुवात केली होती. बुधवारी मनपा अधिकाऱ्यांना ही बाब पुन्हा लक्षात आणून दिल्याने हे काम बंद पाडले आहे.

– अॅड. श्याम बडोदे

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या भूखंडावर बिल्डरचे अतिक्रमण, अधिकाऱ्यांनी असे रोखले काम appeared first on पुढारी.