नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या 104 सर्वसाधारण (खुल्या) जागांपैकी 35 जागांवर ओबीसी आरक्षणासाठी दि. 29 रोजी सोडत काढण्यात येणार असून, 69 जागांवर नव्याने महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. यामुळे या आधी अशा स्वरूपाच्या प्रभागात आरक्षण नसणार्‍या अनेकांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. अनेकांना महिला आरक्षणाचा फटका बसला तर थेट निवडणुकीबाहेर जावे लागण्याची वेळ येऊ शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात अधिसूचना जारी करत समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्यानुसार आरक्षण 50 टक्क्यांवर जाणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार यापूर्वी जाहीर झालेल्या सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत रद्द करण्यात आली असून, आता 104 सर्वसाधारण जागांमधून आधी 35 जागांवर ओबीसींचे आरक्षण काढण्यात येईल. त्यातील 18 जागा महिलांसाठी आरक्षित असेल. यानंतर 69 सर्वसाधारण जागांपैकी 34 जागांवर महिला आरक्षण असेल.

नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण प्रवर्ग महिला अशा क्रमाने आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.29) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. 29 जुलैला ओबीसी पुरुष आणि महिला तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर त्याबाबत 30 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप प्रसिद्ध करणे आणि तसेच प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. दि. 5 ऑगस्ट रोजी आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

अनेकांच्या डोक्यावर टांगती तलवार
शहरातील प्रभाग क्रमांक 7 ते 11 या पाच प्रभागांमध्ये अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण आहे. यामुळे या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गाचे (ओबीसी) आरक्षण राहणार नाही. मात्र, या प्रभागातील तिसरी जागा सर्वसाधारण असल्यामुळे या ठिकाणी फेरआरक्षण निघून ते महिला राखीव झाल्यास येथील प्रस्थापितांना थेट निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित पाचही प्रभागांत अनेकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

प्रवर्गनिहाय जागा
खुल्या 69, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 35, अनुसूचित जाती 19, अनुसूचित जमाती 10

हेही वाचा :

The post नाशिक : मनपाच्या 69 जागांसाठी नव्याने महिला आरक्षण appeared first on पुढारी.