Site icon

नाशिक : मनपात २०८ फायरमनच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे. या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने टीसीएस, एमकेसीएल आणि आयबीपीएस या संस्थांना पत्र पाठवून भरती करण्याबाबत विचारणा केल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेतील बहुप्रतिक्षित नोकरभरतीचा बिगूल वाजला आहे.

नाशिक शहराचा विस्तार वाढत असल्याने तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अग्निशमन दल सुसज्ज करण्यासाठी नोकरभरती करणे आवश्यक आहे. महापालिकेत गेल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून कुठल्याही प्रकारची सरळ सेवेने कायमस्वरूपी नोकरभरती झालेली नाही. महापालिकेत ‘क’ वर्ग संवगार्तील मंजूर पदांची संख्या ७,०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या अडीच हजारांहून अधिक आहे. सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी, नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकरभरतीला अडचणीची ठरत आहे. कोरोनाकाळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतीबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन या महत्वाच्या विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजूरी दिली होती. परंतु, मनपाची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने भरतीप्रक्रिया रखडली होती.

अखेरीस नगरविकास विभागाने पहिल्या टप्प्यात अग्निशमन विभागातील फायरमनच्या रिक्त २०८ पदांच्या भरतीला हिरवा कंदील दर्शवल्याने या पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे. अग्निशमन विभागात फायरमनची २९९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ९१ पदे कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात या विभागातील २०८ पदांसाठीची सेवा प्रवेश नियमावली आणि आरक्षण बिंदू नामावलीला मंजूरी दिल्याने महापालिकेने भरती प्रक्रियेला सुरूवात केली आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील २०८ पदांच्या भरतीला परवानगी दिली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सेवा प्रवेश नियमावलीही मंजूर केल्याने २०८ पदांच्या भरतीसाठी टीसीएस, एमकेसीएल,आयबीपीएस या संस्थांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर योग्य त्या संस्थेबरोबर कार्यवाही केली जाईल.

– डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : मनपात २०८ फायरमनच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील appeared first on पुढारी.

Exit mobile version