नाशिक : मनपासमोर ४० कोटी वसुलीचे आव्हान

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चालू आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीसाठी दिलेल्या १७५ कोटी उद्दीष्टापैकी १५८ कोटी रूपयांची वसुली झाली असून, पाणीपट्टीपोटी ४० कोटींपैकी ५० कोटी मनपाच्या तिजोरीत आतापर्यंत जमा झाले आहे. परंतु, आता ३१ मार्चअखेर म्हणजे पुढील ३० दिवसात घरपट्टी, पाणीपट्टी मिळून जवळपास ४० कोटींचा महसूल वसुलीचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. यामुळे विविध कर विभागाने आता महसूल वसुलीकरता अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

दरम्यान, कर वसुलीकरता महापालिकेच्या कर विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. यामुळे आऊटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करता येऊ शकते का याबाबत प्रशासनाकडून विचार केला जात असून, याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. घरपट्टी व पाणीपट्टी महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे मार्ग आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा प्रमाणात कर वसुली होत नसल्याने थकबाकीचा डोंगर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कर भरण्यास करदात्यांना चालना मिळावी, यासाठी मनपाकडून आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या पहिल्या तीन महिन्यात कर सवलत दिली जाते. असे असूनही त्यास सर्वच मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कर वसुलीचे उद्दीष्ट कधीच पूर्ण होत नाही. आर्थिक वर्ष संपण्यास ३० दिवस बाकी आहेत. असे असताना पाणीपट्टी व घरपट्टीपोटी मनपाला ४० कोटींचा महसूल वसूल करणे बाकी आहे.

मालमत्ता कर वसुलीची विभागनिहाय स्थिती (कोटीत)

विभाग – वसूली

सातपूर – १८ कोटी ३८ लाख ७४ हजार

पश्चिम – २९ कोटी आठ लाख दोन हजार

पूर्व – २५ कोटी ९२ लाख

पंचवटी – २९ कोटी २३ लाख १२ हजार

सिडको – ३३ कोटी ९ लाख ५६ हजार

नाशिकरोड – २२ कोटी ८७ लाख ५६ हजार

एकूण वसुली – १५८ कोटी ५९ लाख ७५ हजार

——————————

पाणीपट्टी वसुलीची विभागनिहाय स्थिती (कोटीत)

विभाग – वसुली

सातपूर – ७ कोटी ३० लाख ६८ हजार ९७८

पंचवटी – ९ कोटी ५४ लाख आठ हजार ८७२

सिडको – ११ कोटी ६६ लाख ४५ हजार ४५६

नाशिकरोड – ९ कोटी ९४ लाख दोन हजार ४६३

पश्चिम – ५ कोटी ४५ लाख ५९ हजार ७७

पूर्व – ७ कोटी ९६ लाख ४४ हजार १०३

एकूण – ५० कोटी ५४ लाख आठ हजार ९४९

हेही वाचा :

The post नाशिक : मनपासमोर ४० कोटी वसुलीचे आव्हान appeared first on पुढारी.