नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बाणायत

भाग्यश्री बाणायत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या धूरफवारणी ठेक्यासह इतरही ठेक्यात वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांची शासनाने सहा महिन्यांतच उचलबांगडी केली. औषध फवारणीच्या ठेकेदारासोबत शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतल्याच्या कारणामुळे आत्राम हे दीड महिन्यापूर्वी वादात सापडले होते. त्यांच्या रिक्त पदावर शिर्डी संस्थानच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांची नियुक्ती झाली आहे.

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या बदलीनंतर जुलै २०२२ मध्ये अशोक आत्राम यांची शासनाने मनपात नियुक्ती केली. आत्राम यांची नियुक्ती झाल्यानंतरही मनपा प्रशासनाने त्यांच्याकडे कामांचा कार्यभार सोपविला नव्हता. त्यांच्याकडे फाइल आणि इतरही कामांसंबंधित कागदपत्रे येत नसल्याने त्यांनी संबंधित विभागाचे खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांना आदेश जारी करत सर्व फाइल्स माझ्यामार्फतच आयुक्तांकडे गेल्या पाहिजे, असे बजावले होते. या आदेशामुळेदेखील ते वादात सापडले होते. घंटागाडी ठेका त्याचबरोबर पेस्ट कंट्रोलच्या वादग्रस्त ठेकेदाराला पाठीशी घातल्याच्या आरोपांमुळे ते वादग्रस्त ठरले होते. पेस्ट कंट्रोलची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना त्यांनी शासकीय विश्रामगृहावर ठेकेदारासोबत बैठक घेतल्याची बाब समोर आली होती. आयुक्तांनी या प्रकरणी आत्राम यांच्यासह मलेरिया अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांना नोटीस बजावली होती.

मनपात अतिरिक्त आयुक्तपदावर आतापर्यंत महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात होती. परंतु, बाणाईत यांच्या रूपाने प्रथमच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक मनपा अतिरिक्त आयुक्तपदी भाग्यश्री बाणायत appeared first on पुढारी.