नाशिक : सतीश डोंगरे
गेल्या २ जून रोजी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेत नवे आयुक्त कोण असणार, यावरून भाजप-शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेच ४९ दिवसांनंतर संपुष्टात आली. त्यात सेनेनी बाजी मारली असून, भाजपची पिछेहाट झाल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेत आपल्याच मर्जीतील आयुक्त नेमण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू होती. विशेषत: आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये यावरून चांगलेच शीतयुद्ध पेटले होते. दोघांकडून अधिकाऱ्यांची नावे समोर केली गेली. मात्र, कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने, राजकारण्यांच्या लढाईत नाशिक महापालिका वाऱ्यावर असल्याचे चित्र काही दिवसांपासून बघावयास मिळत होते. त्यातच सत्ताधारी सेना-भाजपला राष्ट्रवादी जोडला गेल्याने ही लढाई आणखी तीव्र होते की काय? अशी शंका उपस्थित केली जात असतानाच नाशिक महापालिकेच्या नव्या आयुक्तांची घोषणा केली गेली. दरम्यान, नवे आयुक्त डॉ. ए. एन. करंजकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मर्जीतील असल्याचे बाेलले जात आहे. त्यामुळे आयुक्त नियुक्तीत पालकमंत्री दादा भुसे यांची सरशी झाल्याची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
अनेकांची नावे चर्चेत
माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे नाव समोर केले गेले होते. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलीप स्वामी व रघुनाथ गावडे यांच्या नावाला पसंती दर्शविली होती. फिल्मसिटीचे अविनाश ढाकरे हेदेखील सुरुवातीला शर्यतीत होते. या सर्वांची नावे मागे पडून, शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अशोक करंजकर यांचे नाव अंतिम केल्याची माहिती यापूर्वीच समोर आली होती.
हेही वाचा :
- पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचा सत्कार
- चांद्रयान पाचव्या कक्षेनंतर झेपावणार चंद्राकडे…
- चांद्रयान पाचव्या कक्षेनंतर झेपावणार चंद्राकडे…
The post नाशिक : मनपा आयुक्तपदावर शिवसेनेचा वरचष्मा, भाजपची पिछेहाट appeared first on पुढारी.