नाशिक मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय, ते वृक्ष हटविण्याचे आदेश

नाशिक गंगापूर रोड व दिंडोरी रोडवरील वृक्ष हटविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोड, दिंडोरी रोडवरील धोकादायक वृक्ष हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी उद्यान विभागाला दिले आहेत. या धोकादायक वृक्षांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांचा जीव गेला, तर कित्येक जायबंदी झाल्याने सदर वृक्ष हटविण्याची मागणी गंगापूर रोडवरील नागरिकांच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. करंजकर यांची भेट घेत गंगापूर रोडवरील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी केली. या धोकादायक वृक्षांमुळे झालेल्या अपघाताच्या घटनाही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यावर आयुक्तांनी उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांना बोलावून गंगापूर रोड, दिंडोरी रोडसह इतरही रस्त्यातील धोकादायक वृक्षांबाबत माहिती घेतली. धोकादायक वृक्ष हटविण्याबाबत येत्या १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

ऑन दी स्पॉट निर्णय घेणार

यावेळी उपस्थित रहिवाशांनी उद्यान विभागाकडे लेखी तक्रारी तसेच दूरध्वनीवरून माहिती कळवूनही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर भदाणे यांनी धोकादायक वृक्षतोड करताना पर्यावरणप्रेमी संस्था तसेच समितीकडून त्यावर हरकत घेतली जात असल्याने कार्यवाही करता येत नसल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसांत धोकादायक वृक्ष हटविणे वा त्यांचा विस्तार कमी करण्याबाबत जाहीर नोटीस देऊन संबंधित ठिकाणी हरकती व सूचना देणाऱ्या नागरिकांना आमंत्रित करून ऑन दी स्पॉट निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाॅगिंग ट्रॅकवर बांधकामे

सिरीन मेडोज तसेच नवश्या गणपती येथील जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू असून, त्याठिकाणी सभागृह तसेच इतरही प्रकारचे बांधकाम केले जात असल्याने संबंधित कामे थांबवा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख शिंदे यांनी केली. आमदार निधीतून शहरात सुरू असलेली कामे नित्कृष्ठ दर्जाची असल्याचे निदर्शनास आणून देत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ही बाब कळविण्याची सूचना जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी दिली.

हेही वाचा –