नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची प्रतीक्षा लागून असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांची यंदाची दिवाळी आणखी गोड जाणार आहे. कारण दिवाळीपूर्वीच 4,673 कायम आणि 3,231 इतक्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या हाती वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पडणार आहे.

तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांची बदली होण्याआधीच म्हणजे 22 जुलै रोजी त्यांनी वेतन आयोग फरकाबाबतचा आदेश जारी करत कर्मचार्‍यांना भेट दिली आहे. ऑगस्ट पेड इन सप्टेंबरच्या वेतनात कर्मचार्‍यांना वेतन फरकाच्या रकमेचा पहिला हप्ता अदा होणार आहे. वेतनाच्या रकमेसह सुमारे 50 हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्मचार्‍यांच्या हाती पडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या धर्तीवर 1 जानेवारी 2016 पासून महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, हा निर्णय घेताना राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या समकक्ष पदांच्या वेतनश्रेणीनुसार महापालिकेतील कर्मचार्‍यांना आयोग लागू करण्याची अट शासनाने घातली.

त्यानुसार महापालिकेच्या मुख्य व लेखा वित्त अधिकार्‍यांनी सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे महापालिकेवर पडणारा आर्थिक भार आणि वर्तमान आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन आयुक्तांकडे अहवाल सादर झाल्यानंतर महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष 1 एप्रिल 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी व भत्ता लागू करण्यात आला. मात्र, वेतन फरकाची रक्कम प्रलंबित होती. ही रक्कम पाच टप्प्यांत अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका अधिकारी, कर्मचार्‍यांबरोबरच मनपा शिक्षण विभागातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनाही फरक मिळणार आहे.

पहिल्या हप्त्यासाठी 96 कोटी
सातव्या वेतन आयोगाच्या फरकातील पहिल्या टप्प्यात 96 कोटी रुपये अदा केले जातील. दिवाळीपूर्वी वेतन फरकाची रक्कम अदा करता यावी, यासाठी मनपा प्रशासनाने अनेक विकासकामांना कात्री लावण्यात आली होती.

सेवानिवृत्तांना असा लाभ मिळेल
मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार उपदान, अंशराशीकरणापोटी देय फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे. 2016-17 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना 2022-23, 2017-18 मध्ये निवृत्त झालेल्यांना 2023-24, 2018-19 मध्ये निवृत्त झालेल्यांना 2024-25, 2019-20 मध्ये सेवानिवृत्त झालेल्यांना 2025-26, तर 2020-21 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना 2026-27 पर्यंत फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच गिफ्ट, सप्टेंबरच्या वेतनात पहिला हप्ता appeared first on पुढारी.