नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचे सानुग्रह अनुदान त्यानंतर वेतन आयोगाचा पहिला हप्ता आणि यानंतर लगेचच पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नतीचीही भेट मिळणार आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदे भरण्यासाठी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कर्मचार्‍यांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या रिक्तपदांवर पदोन्नती देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. पदोन्नतीतून अग्निशमन विभाग वगळण्यात आला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील कर्मचार्‍यांना 2021 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात तसेच कनिष्ठ लिपिक संवर्गातील कर्मचार्‍यांना तदर्थ पदोन्नती देण्यात आली. गट-अ ते ड मधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संवर्गनिहाय दर्शविणारी संवर्गनिहाय प्रारूप ज्येष्ठता यादी 24 मार्चला प्रसिध्द करण्यात आली होती.

पदोन्नती कर्मचारी निवड समितीत अतिरिक्त आयुक्त (शहर) हे या कर्मचारी निवड समितीचे अध्यक्ष आहेत. मुख्य लेखापरीक्षक बोधीकिरण सोनकांबळे, उपआयुक्त (कर) अर्चना तांबे व त्या-त्या संवर्गाच्या अनुषंगाने संबंधित विभागप्रमुख हे या समितीचे सदस्य असतील. उपआयुक्त (प्रशासन) हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीने आस्थापनेवरील रिक्तपदांपैकी पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्तपदांचा संवर्गनिहाय आढावा घ्यायचा असून, त्यानुसार संवर्गनिहाय निवड यादी तयार करावयाची आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.