नाशिक : मनपा प्रशासनाकडून आयटी, लॉजिस्टिक पार्कला चालना

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आडगाव शिवारात प्रस्तावित करण्यात आलेल्या आयटी पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मनपा प्रशासनाकडून नव्याने चालना देण्यात येणार असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यानुसार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्याबाबत संबंधित ठेकेदाराकडून न मिळणारा प्रतिसाद आणि करारनाम्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन मिळण्याबाबतचा प्रस्ताव पुढे सरकत नसल्याने नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरम्यान, लॉजिस्टिक पार्कसाठीदेखील ट्रक टर्मिनल सोडून अन्य पर्याय तपासले जाणार आहेत. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयटी पार्कसाठी पाठपुरावा करत त्यासाठी आयटी परिषदही नाशिकमध्ये भरविली होती. आडगाव शिवारात 365 एकर क्षेत्रात आयटी पार्क उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने स्वमालकीची 10 एकर जागा आरक्षित केली. या जागेव्यतिरिक्त उर्वरित जागा एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट या तत्त्वावर जागामालकांकडून भाडेतत्त्वावर घेतली जाणार होती. त्यासाठी इच्छुक जागामालकाकडून महापालिकेने प्रक्रियादेखील राबविली होती. त्यानुसार 10 जागामालकांनी इच्छा दर्शविली आहे. या संपूर्ण आयटी पार्क प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याची जबाबदारी अवघा एक रुपया मानधन घेऊन बनवून देण्याची तयारी एका ठेकेदाराने दाखविली, मात्र त्यासोबत करारनामा कसा करायचा याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्यासाठी वकिलांकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, त्यावर अद्याप कोणताही अभिप्राय मनपाला मिळालेला नाही. राज्यात भाजपची सत्ता पुन्हा आल्यानंतर आयटी पार्क प्रकल्प करण्यासाठी शासनस्तरावरून पाठपुरावा सुरू झाला आहे. भाजपचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी आयुक्तांकडे यासंदर्भात मागणी केली आहे. लॉजिस्टिक पार्ककरिता मनपाने 64 एकर जागेची जमवाजमव केली. लॉजिस्टिक पार्क हा भारतमाला योजनेंतर्गत प्रकल्प साकारल्या जाणार्‍या सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडोरलगत असणार आहे.

नाशिकमध्ये आयटी पार्क होण्याबाबत केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार कोणते बदल करणे शक्य आहे याबाबत माहिती घेण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना केली आहे. तसेच सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याकरता नव्याने प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. लवकरच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा, आयुक्त.

माझ्या महापौरपदाच्या काळात निओ मेट्रो, आयटी पार्क तसेच नमामि गोदा, सिटी बससेवा असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प काही मार्गी लागले तर काही प्रस्तावित आहेत. नाशिक शहराच्या विकासाच्या द़ृष्टीने आयटी पार्क अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ठरेल. नाशिक महापालिकेचा स्वत:चा प्रकल्प अशी त्याची इतिहासात नोंद होईल. रोजगाराबरोबरच मनपाला एक हजार कोटीपर्यंत महसूलही मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची नाशिककरांना प्रतीक्षा आहे. – सतीश कुलकर्णी, माजी महापौर.

भाजपच्या सत्ताकाळात तसेच माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने नाशिक शहरात आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क प्रस्तावित करण्यात आले आहेत. मध्यंतरी दोन्ही प्रकल्पांना ब्रेक लागला असला तरी दोन्ही प्रकल्प माझ्या मतदारसंघात असल्यामुळे त्याबाबतचा मी आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आयुक्तांनी देखील सकारात्मक पावले उचलल्याने या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. प्रकल्पांमुळे शहरात रोजगार मिळणार आहे. – अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार, भाजप.

हेही वाचा:

The post नाशिक : मनपा प्रशासनाकडून आयटी, लॉजिस्टिक पार्कला चालना appeared first on पुढारी.