नाशिक मनपा : महिला आरक्षणाने दिग्गजांची दांडी गुल, समीकरणे बदलणार

नाशिक मनपा आरक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांची दांडी गुल झाल्याने एकतर संबंधितांना पर्यायी प्रभागात संधी शोधावी लागणार आहे किंवा कुटुंबातीलच महिलांना उमेदवारी देण्याची वेळ येणार आहे. पंचवटी, सातपूर आणि नाशिकरोड विभागात अनेकांची जागा मिळविण्यासाठी धांदल उडणार आहे, तर काहींना बाजूच्याच प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. अनेक ठिकाणी तर नगरसेवकांना आमने-सामने असा सामना करावा लागणार आहे.

न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण कायम ठेवले. त्यानुसार नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 104 जागांमधून ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीत प्रथम ओबीसी प्रवर्गासाठी 35 जागा आरक्षित करण्यात आल्या. या 35 जागांतून महिलांच्या 18 जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या 34 जागांचे आरक्षण काढण्यात आले. विशेषत: ओबीसी महिला आणि सर्वसाधारण गटातून पडलेल्या महिला आरक्षणामुळे अनेकांसमोर निवडणूक लढविण्याचे संकट उभे राहिले आहे. पूर्व विभागातील दिवे बंधूंना तर मोठा धक्का सहन करावा लागला आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये अनुसूचित जमाती वगळता, दोन्ही जागांवर महिला आरक्षण पडल्याने राहुल दिवे यांना अन्य प्रभागाचा पर्याय शोधावा लागणार आहे, तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये अनुसूचित जाती महिला, ओबीसी आणि एक जागा सर्वसाधारण झाल्याने प्रशांत दिवे यांची अडचण वाढली आहे. याच प्रभागात भाजपचे नगरसेवक अनिल ताजनपुरे यांनादेखील अन्य प्रभागात संधी शोधावी लागणार आहे. भाजपचे माजी सभागृहनेते सतीश सोनवणे प्रभाग 39 मधून इच्छुक होते. मात्र, या प्रभागात अनुसूचित जाती, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला अशा स्वरूपाचे आरक्षण पडल्याने सोनवणे यांना शेजारील प्रभाग क्र. 40 मधून उमेदवारी करावी लागणार आहे.

पंचवटी विभागातील प्रभाग क्र. 7 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने माजी सभागृह नेते कमलेश बोडके यांची अडचण वाढली आहे. प्रभाग क्र. 44 मध्येदेखील अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांना अन्य प्रभागाची शोधाशोध करावी लागेल किंवा घरातीलच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागणार आहे. भाजपचे भगवान दोंदे यांनाही कुटुंबातील महिला सदस्यांना उभे करावे लागेल. सिडको विभागात प्रभाग 37 मध्ये शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या रत्नमाला राणे व अनिता भामरे या दोघींमध्ये तिकिटासाठ रस्सीखेच होईल. सर्वसाधारण खुला प्रभाग झाल्याने शिवसेनेचे दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी तसेच भाजपचे मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे यांच्यातील स्पर्धक कमी झाले आहेत. सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर, किरण गामणे, प्रवीण तिदमे, राजेंद्र महाले, सुवर्णा मटाले सेफ झोनमध्ये आहे. नाशिकरोडमध्ये भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विशाल संगमनेरे यांची प्रभाग 23 मध्ये महिलांसाठी दोन आरक्षण पडल्याने अडचण वाढली आहे.

बोरस्ते सेफ, शेख-ठाकरेंसमोर अडचणी : प्रभाग 9 मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. सर्वसाधारण जागेमुळे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते बचावले असून, दोन महिला आरक्षणामुळे त्यांच्यासमोरील इतर स्पर्धक कमी झाले आहेत. भोसले कुटुंबीयांनाही धक्का सहन करावा लागणार असून, प्रभाग 16 मध्ये भाजपमध्ये यापूर्वी रस्सीखेच होती. परंतु, आता दोन पुरुष व एक महिला असे आरक्षण पडल्याने भाजपमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मनसेचे सलीम शेख प्रभाग क्र. 15 मधून इच्छुक होते. मात्र याठिकाणी दोन महिला आरक्षण आणि एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्याने शेख यांनी आपला मोर्चा 14 मध्ये वळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना आरक्षणामुळे प्रभाग 15 मधूनच नशीब अजमावे लागणार आहे.

महाविकास आघाडीसमोर पेच
जुने नाशिकमधील प्रभाग क्रमांक 18, 19 व 20 मधील आरक्षणामुळे राजकीय सूत्रे बदलणार आहेत. प्रभाग 18 मध्ये दोन महिला व एक सर्वसाधारण आरक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांची अडचण वाढली आहे. खुल्या जागेवर माजी महापौर विनायक पांडे, अ‍ॅड. यतीन वाघ, गजानन शेलार, राजेंद्र बागूल हे दिग्गज राजकारणी समोरासमोर येण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारी देताना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेसमोर प्रश्न उभा राहील. प्रभाग क्र. 19 मध्ये दोन महिला व एक जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने काँग्रेस नेते शाहू खैरे तसेच भाजपचे गणेश मोरे, गजानन शेलार, विनायक पांडे हे समोरासमोर येऊ शकतात.

The post नाशिक मनपा : महिला आरक्षणाने दिग्गजांची दांडी गुल, समीकरणे बदलणार appeared first on पुढारी.