नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांनी महापालिकेत विविध विकासकामे तसेच मुद्यांबाबतचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ३०) महापालिका मुख्यालयात बैठक बोलविली आहे. यामुळे या बैठकीच्या निमित्ताने शासनाकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिक्त पदे भरण्यासंदर्भातील विषयाला चालना मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्यात ठाकरे सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग होता. त्यावेळी त्यांच्याकडे नाशिक मनपातील रिक्त पदे भरण्याबाबत अनेकदा पाठपुरावा झाला. तसेच नाशिक मनपात शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन भरती प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतरही कोणत्याच हालचाली शासनस्तरावरून झाल्या नाहीत. यामुळे आता खुद्द शिंदे गटाचेच सरकार असल्याने भरतीविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असतानादेखील नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेत बैठक घेत विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्तांतर झाल्याने भुजबळ यांचे आश्वासनही हवेत विरले. गेल्या दीड महिन्यापासून पालकमंत्री निवडीच्या प्रतीक्षेत अनेक जण होते. आता पालकमंत्री पद नाशिकचेच भूमिपुत्र असलेले दादा भुसे यांच्याकडे गेल्याने सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. शिंदे गटातील एक विश्वासू मंत्री म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने महापालिकेसंदर्भातील प्रश्न ते सोडवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेत आजमितीस जवळपास अडीच ते तीन हजार इतकी पदे रिक्त आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे मनपाचे कामकाज सुरू असून, कायम असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष : महापालिकेतील कर्मचारी भरती तसेच नमामि गोदा प्रकल्प, आयटी पार्क, निओ मेट्रो, लॉजिस्टिक पार्क, पाणीपुरवठा पाइपलाइन, मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा पाहता या सर्व विषयांचा आढावा होऊन ते मार्गी लागण्याच्या दृष्टीने पावले उचलले जातील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनपा मुख्यालयातील आजच्या बैठकीत प्रलंबित विषयांना चालना मिळणार appeared first on पुढारी.