नाशिक: पुढारी वृत्तसेवा
शहरातील हेल्मेटसक्तीला नाशिक महापालिकेनेदेखील हातभार लावला असून, महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात दुचाकीवर विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी जारी केले आहेत. प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून विनाहेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारांची यादी पुढील कारवाईसाठी परिवहन विभागाला सादर केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांत नाशिक जिल्ह्यात घडलेल्या अपघातांचे तुलनात्मक विश्लेषण केले असता रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात हे केवळ दुचाकी व पादचाऱ्यांचे आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत होणारे दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गत महिन्यात परिवहन अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात हेल्मेट व सीटबेल्ट वापरासंबंधी पाहणी केली असता मनपातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट व सीटबेल्ट घातलेले आढळून आले नाहीत. त्यामुळे संबंधितांवर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. हेल्मेटसक्ती व सीटबेल्ट संदर्भातील नियमाची महापालिका मुख्यालयात प्रवेश करणारे अधिकारी, कर्मचारी अंमलबजावणी करतात किंवा नाही यासंदर्भात कारवाईसाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून विनाहेल्मेट येणाऱ्यांची यादी परिवहन कार्यालयास सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाने महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी करत महापालिकेत दुचाकीवर येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट प्रवेशास प्रतिबंध घातला आहे.
हेही वाचा :
- काळजी घ्या ! पुणे शहरात आय फ्लूचे 6000 रुग्ण
- ॲड. यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा गजाआड
- नाशिक : गंगापूरची शंभरीकडे वाटचाल ! जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर
The post नाशिक : मनपा मुख्यालयात प्रवेशासाठी हेल्मेटसक्ती, दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांना बंधन appeared first on पुढारी.