नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेतील कथित होर्डींग्ज घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल एकीकडे तयार झाला असताना दुसरीकडे ज्या होर्डींग्जधारकांनी या घोटाळ्याची तक्रार केली होती. त्यांच्या होर्डींग्जची तपासणी नगररचना विभागामार्फत सुरू झाली आहे. होर्डींग्जधारकांकडून स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची मागणीही होत आहे. या माध्यमातून तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचा आरोप होत आहे.
जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डींग्ज घोटाळा करण्यात आल्याचा आरोप नाशिक आऊटडोअर अॅडव्हर्टाईजिंग वेल्फेअर असोसिएशनतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. विशिष्ठ मक्तेदारासाठी निविदा अटी-शर्थींचे उल्लंघन करून महापालिकेचा कर बुडविला जात असल्याचा दावा असोसिएशनने केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत केली होती. शहरातील खुल्या जागांवर होर्डींग्ज अर्थात जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेने १६ डिसेंबर २०२१ रोजी निविदा जारी केली होती. महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागात २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारल्याची नोंद असताना शहरात मात्र ६३ ठिकाणी जाहीरात फलक उभारण्यात आले असून या माध्यमातून महापालिकेला कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला होता.
या प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीने आयुक्तांना सादर केला आहे. अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. मात्र अद्याप त्यावर अधिकृतरित्या कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान, नगररचना विभागामार्फत शहरातील होर्डींग्जची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी होर्डींग्ज तपासणी सुरु केल्याची चर्चा आहे.
स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची मागणी
शहरात होर्डींग्जचा आकार निश्चित करून देण्यात आला आहे. त्यानुसारच परवानगी दिली जाते. होर्डींग्जचे परवाना नुतनीकरण करताना नगररचना विभागामार्फत होर्डींग्जची तपासणी सुरू आहे. होर्डींग्जच्या २० ते २५ वर्षे जुन्या स्ट्रक्चरसाठी स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे.
- Leopard News : अखेर उंब्रज येथे दुसरा बिबट्याही जेरबंद !
- Nashik ZP : विधानसभा उपाध्यक्षांच्या ‘त्या’ पत्राने मिनी मंत्रालयात खळबळ
The post नाशिक मनपा होर्डींग्ज घोटाळा : ज्यांनी तक्रार केली त्यांच्याच होर्डींग्जची तपासणी appeared first on पुढारी.