Site icon

नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

शहरापासून जवळ मालेगाव रोडवर दहेगाव शिवारातील नगर परिषदेच्या कचरा डेपोला शुक्रवारी (दि.26) आग लागली. कचऱ्यात कापड, प्लास्टिक असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत चालल्याचे पाहून येवला, नांदगाव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्यानंतर सर्वांनी मिळून काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी तापमान वाढीमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोणी तरी खोडसाळपणा करून आग लावल्याचीही शंका उपस्थित होत आहे.

शहरापासून सुमारे 4 किमी अंतरावर हा कचरा डेपो आहे. शहर परिसरातील सर्व कचरा गोळा केल्यानंतर या डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. कचऱ्यात कापड व इतर वस्तू असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पालिकेचे अधिकारी विजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे जयदेव मगर, पर्बत बहोत, प्रदीप करोसिया, सचिन पवार यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग वाढत जात होती. आगीमुळे सर्वत्र धुराचे प्रचंड लोळ पसरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या अगोदरही कचरा डेपोला अनेकवेळा आग लागली आहे. यामुळे वारंवार आग लागते की लावली जाते, अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनमाडच्या कचरा डेपोला आग appeared first on पुढारी.

Exit mobile version