नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान

मनमाड www.pudhari.news
नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागासाठी आज रविवार (दि. 30) रोजी मतदान घेण्यात आले. त्यानुसार सोसायटी गटात 96 टक्के, ग्रामपंचायत गटात शंभर टक्के, व्यापारी गटात 95 टक्के हमाल मापारी गटात ९२ टक्के मतदान झाले.
निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत असून अत्यंत चूरशीची झालेल्या या निवडणुकीत एका बाजूला शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गट आणि माजी सर्व माजी आमदार असे चित्र होते. त्यामुळे निवडणुकीत विद्यमान आमदारांसोबत 6 माजी आमदार आणि ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीत माघारीच्या दिवशी शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यामुळे रविवार (दि. 30) कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही गटांनी मतदारांना बाहेर गावी नेले. त्यांना मतदान करण्यासाठी 10 खाजगी  बसेस मधून मतदानस्थळी आणण्यात आले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आमदार सुहास अण्णा कांदे विश्रामगृहावर तर माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यलयात ठाण मांडून होते. कोणताही अनुचित प्रकार न घटता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
बाजार समितीत एकूण 18 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यात सोसायटी गटातून 11, ग्रामपंचायत गटातून 4, व्यापारी गट -2 आणि हमाल मापारी 1 जागेचा समावेश आहे. सकाळी 8 पासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र निवडणुकीच्या काही दिवसा अगोदर दोन्ही गटांनी मतदारांना बाहेरगावी नेले होते. त्यामुळे त्यांना घेऊन 9 नंतर 10 खाजगी बसेस मधून मतदानस्थळी आणण्यात आले. यावेळी दोन्ही गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान घेण्यात आले असून सोसायटी गटात एकूण 295 मतदार होते. त्यापैकी 2 मयत तर दोन जणांचे 2 ठिकाणी नाव आल्यामुळे 291 मतदान झाले. ग्रामपंचायत गटात 210 मतदार होते. त्यात शंभर टक्के मतदान झाले. व्यापारी गटात 147 मतदार होते. त्यापैकी अंदाजे 95 टक्के तर हमाल मापारी गटात 135 मतदार असून त्यापैकी 90 टक्के पेक्षा तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी उद्या सोमवारी (दि.1) सकाळी 11 पासून केली जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सिद्धार्थ मोरे यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या मध्ये मोठा राडा होऊन निवडणुकीला गालबोट लागले होते. त्यामुळे मतदानाच्या दिवशी देखील गोंधळ, गडबड होऊ शकते अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे पोलीस उपाध्यक्ष समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी मतदान केंद्राजवळ चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
निवडणूकीसाठी राजकीय पक्ष साम, दंड, भेदचा वापर
दरम्यान नाशिक जिल्ह्यात मनमाड बाजार समिती देखील मोठी मानली जाते. राजकीयदृष्ट्या या बाजार समितीला जास्त महत्व असल्यामुळे त्याची निवडणूक विधानसभासह इतर सर्व निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून मानली जाते. त्यामुळे बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष साम, दंड, भेदचा वापर करतात. तसाच काहीसा प्रकार या निवडणुकीत देखील दिसून आला. दोन्ही गटाने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 15 दिवसापूर्वीच मतदारांना सहलीला नेण्यात आले. या निवडणुकीत कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि उधळपट्टी झाली असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे मनमाड बाजार समितीवर कोणाची सत्ता येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post नाशिक : मनमाड बाजार समिती निवडणुकीत 96 टक्के मतदान appeared first on पुढारी.