नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल

धग पाणीटंचाईची लोगो www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : रईस शेख
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. सध्या शहरात 12 ते 15 दिवसांड पाणीपुरवठा केला जात आहे.

सुमारे आठ महिन्यांपूर्वी शहर परिसरासोबत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होऊन धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईतून सुटका होईल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र, वागदर्डी धरणातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात केवळ 25 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात सुमारे तीन ते चार दशलक्ष घनफूट पाण्याचा मृतसाठा आहे. उर्वरित पाण्यातून शहरात सध्या 12 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहराचा पाणीपुरवठा हा पालखेड धरणातून मिळणार्‍या रोटेशनवर जास्त अवलंबून आहे.

पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते पाणी पाटोदा तलावात साठवणूक करण्यात येते. त्यानंतर पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात घेत शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दीड महिन्यापूर्वी पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर थकबाकीचे कारण पुढे करत पाटबंधारे विभागाने वेळेवर आणि पाहिजे तेवढे पाणी दिले नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेतर्फे महिन्यातून दोन वेळाच पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ नागरिकांवर आलेली असताना दुसरीकडे मात्र छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पाणीटंचाईबाबत गप्प आहेत. कोणीही पाटबंधारे विभागाला हक्काच्या पाण्यासाठी जाब का विचारत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

पालखेडमधून आवर्तन सोडा
या भीषण टंचाईतून सध्या पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा
सध्या मनमाड शहरात 12 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. शहराचा पाणीपुरवठा हा पालखेड धरणातून मिळणार्‍या रोटेशनवर जास्त अवलंबून आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते पाणी पाटोदा तलावात साठवणूक करण्यात येते. त्यानंतर पंपिंगद्वारे वागदर्डी धरणात घेत शहरात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

मनमाड www.pudhari.news
मनमाड : शहरात दर पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अतिरिक्त टाक्या भरून ठेवाव्या लागतात. तसेच लहान मुलांसह महिलांना पाण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी भटकंती करावी लागते. (सर्व छायाचित्रे : रईस शेख)

The post नाशिक : मनमाड शहरात पाणीबाणी : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; ऐन उन्हाळ्यात हाल appeared first on पुढारी.