नाशिक : मनसेच्या ‘नाका तिथे शाखा’

राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदारांपर्यंत पाेहचण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पदाच्या चपला बाजुला केल्या पाहिजे. ‘नाका तिथे शाखा’ सुरु करून त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न साेडविण्याकरता मनसैनिकांनी कंबर कसावी, अशा सुचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथील शाखाध्यक्ष व गटाध्यक्षांच्या बैठकीत केल्या.

राज ठाकरे शुक्रवारपासून (दि.१९) नाशिकच्या तीन दिवसीय दाैऱ्यावर आहेत. शनिवारी (दि.२०) त्यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत नाशिकमधील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच आगामी निवडणूकीत यश मिळवण्यासाठी व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्यासाठी शाखा उभारून प्रत्येक नाक्यावर जाऊन लाेकांशी संपर्क साधून संवाद साधा. त्यांच्याशी बाेलल्यास त्यांच्या मनातील भावना, गाेष्टी कळतील, असे मार्गदर्शन मनसेचे नेते अनिल शिराेडे तसेच खाडीलकर यांनी मनसैनिकांना केले. या दाैऱ्यात ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, अनिल शिराेडे, शिरीश सावंत तसेच प्रदेश सरचिटणीस संदीप देशपांडे आणि युवानेते अमित ठाकरे सहभागी झाले आहेत. बैठकीस मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशाेक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, पराग शिंत्रे, जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी जिल्हा प्रमुख सुदाम काेंबडे, मनसे मनपा कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सलीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.

प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये वाद
बैठकीपूर्वीच मनसेच्या नाशिकमधील दाेन प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समजते. शनिवारी (दि.२०) सकाळी पत्रकार परिषद असताना राज ठाकरे यांनी या परिषदेला पत्रकारांशिवाय पदाधिकारी उपस्थित नकाे अशी सुचना एका प्रदेश पदाधिकाऱ्यास दिली. त्यामुळे संबंधित पदाधिकाऱ्याने तेथे असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांना बाहेर थांबण्यास सांगितले. यावरून दाेन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मनसेच्या 'नाका तिथे शाखा' appeared first on पुढारी.