नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस

दिलीप दातीर ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना वॉटर ग्रेस कंपनीने नोटीस बजावली आहे. दातीर यांनी कंपनीची बदनामी केल्याचा आरोप नोटीसच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच पुढील १४ दिवसांत याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही नोटीसद्वारे करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे पूर्व व पश्चिम विभागांतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीला काम देण्यात आले आहे. दिवाळीच्या काळात कंपनीच्या वतीने जवळपास साडेचारशे स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत मनसे शहराध्यक्ष दातीर यांनी २० फेब्रुवारीला महापालिकेसमोर उपोषण केले होते. त्यापूर्वी दातीर यांनी पत्रकार परिषद घेऊन वॉटर ग्रेस कंपनीचे संचालक चेतन बोरा यांच्यावर आरोप केले होते. कर्मचाऱ्यांना २५ ते २७ हजार रुपये मिळत असताना फक्त १२ हजार रुपये दिले जातात, स्वच्छतेचे काम करताना पूरक साहित्य पुरविले जात नाही, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड हे बोरा यांचे नातेवाईक आहेत, अशा प्रकारचे विविध आरोप करताना माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचेदेखील नाव घेतले होते.

दरम्यान, या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर वॉटर गेस कंपनीचे संचालक चेतन बोरा यांनी सी. के. लिगल असोसिएटच्या वतीने दातीर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १४ दिवसांत नोटिशीला उत्तर न दिल्यास कायदेशीर दावा दाखल केला जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनसे शहराध्यक्षांना वॉटरग्रेस कंपनीकडून नोटीस appeared first on पुढारी.