नाशिक : मलढोण येथे दोन दुचाकींवर बिबट्याचा हल्ला; पंधरावर्षीय मुलगा जखमी

नाशिक

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मलढोण येथे एकाच दिवशी 15 मिनिटांच्या अंतरावर दोन दुचाकींवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

पहिल्या घटनेत संतोष तुकाराम धसे (15) या मुलाच्या पायाला बिबट्याने पंजा मारल्याने तो किरकोळ जखमी झाला. तर दुसर्‍या घटनेत बिबट्याने मारलेली झेप चुकल्याने दुचाकीस्वार सुर्यभान चिलु सरोदे (38) हे थोडक्यात बचावले.

मलढोण येथे गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी धसे वस्तीवर राहणारे सखाराम धसे व त्यांचा पुतण्या संतोष हे दोघे सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास दुसंगवाडी मलढोण रस्त्याने गावात निघाले होते. घरापासून अवघ्या 50 ते 60 फुट अंतरावर दुचाकी आली असता पाठीमागून आलेल्या बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. दुचाकीचा वेग कमी असल्याने पाठीमागे बसलेल्या संतोषच्या एका पायाला पोटरी आणि घोट्याजवळ बिबट्याचा पंजा लागून जखम झाली. जखमी संतोष धसे यास वावी येथे दवाखान्यात उपचार करण्यात आले.

या घटने नंतर अवघ्या 15 मिनिटांत या वस्तीपासून जवळ असलेल्या सरोदे वस्तीजवळ गावातून जुन्या वावीरोडने वस्तीकडे जाणार्‍या सुर्यभान चिलु सरोदे यांच्या दुचाकीवर बिबट्याने झडप घातली. परंतु गाडीचा वेग जास्त असल्याने दुचाकी पुढे गेली व बिबट्या पलिकडे मक्याच्या शेतात गायब झाला. घटनेची माहिती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत पसरली.

दरम्यान, मलढोण व परिसरात शेळ्या, मेंढ्यांची संख्या जास्त असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर असून पाळीव प्राण्यांवर हल्ले करणार्‍या बिबट्याने आता माणसांवरही हल्ले करण्यास सुरुवात केल्याने गावातील मेंढपाळ, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजला लावण्याची मागणी पोलिस पाटील आदिनाथ कुदनर, ज्ञानदेव सरोजे, शिवाजी हालवर आदींनी केली आहे.

अधिक वाचा :

The post नाशिक : मलढोण येथे दोन दुचाकींवर बिबट्याचा हल्ला; पंधरावर्षीय मुलगा जखमी appeared first on पुढारी.