नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री

मविप्र निवडणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार (दि. 5)पासून अर्ज विक्रीने सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 146 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामध्ये कार्यकारिणी पदाच्या 138, तर सेवक संचालक जागांच्या 8 अर्जांचा समावेश आहे. अर्जविक्रीला प्रारंभ झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी नेमलेल्या लवादाने संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून, त्याअंतर्गत अर्जविक्री प्रक्रियेला सुरुवात झाली. कार्यकारिणी तसेच संचालकपदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वतः किंवा त्यांच्या समर्थकांकडून हे अर्ज नेले. अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज नेल्याने ही संख्या वाढल्याचे दिसून आले. विविध पदांसाठी उमेदवारी करण्याच्या उद्देशाने काही इच्छुकांनी पाच ते सातपर्यंत अर्ज नेले आहेत.

दरम्यान, पहिल्याच दिवशी पदाधिकारी व संचालक मंडळाकरिता 138 अर्जांची विक्री झाली असून, सेवक सदस्यांसाठी आठ अर्जांची विक्री झाली होती. अर्ज नेमलेल्यांमध्ये नाशिक शहर व ग्रामीणसह सिन्नर, देवळा, सटाणा, मालेगाव, निफाड, इगतपुरी, नांदगाव तालुक्यातील इच्छुकांचा समावेश आहे. 11 ऑगस्टपर्यंत दुपारी बारा ते चार या वेळेत अर्जविक्री व स्वीकृती सुरू राहणार आहे. तर 12 ऑगस्टला छाननी होणार आहे.

मातब्बरांनी नेले अर्ज
मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी मातब्बरांनी अर्ज नेले आहेत. त्यामध्ये आजी-माजी संचालक व पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. आमदार अ‍ॅड. माणिक कोकाटे, हेमंत वाजे, कृष्णा भगत, भाऊसाहेब खताळे, अशोक मुरकुटे, डॉ. विलास बच्छाव, प्रमोद पाटील, मोहन पिंगळे, लक्ष्मण लांडगे आदींनी अर्ज नेले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री appeared first on पुढारी.