Site icon

नाशिक : मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डी फार्मसी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्था संचलित आडगाव येथील डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षापासून ‘डी फार्मसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच मान्यता मिळाली आहे. मात्र, जमिनीचा करार करण्यास विलंब झाल्याने यंदा प्रवेशप्रक्रिया राबविण्यात अडचणी आल्या होत्या. आगामी शैक्षणिक वर्षात 60 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मविप्र संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी दिली.

मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मविप्र संस्थेवर 140 कोटींचे कर्ज व देणे आहे. चार महिन्यांपूर्वी संस्थेतील सत्ता परिवर्तनानंतर विद्यमान कार्यकारी मंडळाने कर्ज कमी करण्यावर भर दिला आहे. विनाअनुदानित शाळांचा बांधकाम निधी जमा होत आहे. तसेच अवास्तव खर्चालाही कार्यकारी मंडळाने लगाम घातला आहे. त्या माध्यमातून 15 कोटीने कर्ज व देणे कमी करण्यात यश आल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले. दिंडोरी महाविद्यालयाला कृषी विद्यापीठाच्या समितीने भेट दिली असून, त्यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून मान्यता मिळणार आहे. मविप्र आर्किटेक्चर महाविद्यालय व खेडगाव विनाअनुदानित महाविद्यालयाला नॅकचे मानांकन मिळाले आहे. आर्किटेक्चर महाविद्यालयाला शरदचंद्र पवार यांचे नाव देण्याचा ठराव असून, नामकरणासाठी दोन लाख रुपये भरल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी स्पष्ट केले. मविप्र संस्थेकडून आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून, या महाविद्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे. तसेच केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. तर मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले.

मविप्र संस्थेत मागील अनेक वर्षांपासून सुमारे 150 शिक्षक विनाअनुदान तत्त्वावर कार्यरत होते. त्यांना अनुदान तत्त्वावर घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधित शिक्षकांचे रोस्टर तयार करण्यासह इतर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. – अ‍ॅड. नितीन ठाकरे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस.

हेही वाचा:

The post नाशिक : मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘डी फार्मसी’ appeared first on पुढारी.

Exit mobile version