नाशिक महानगरपालिका : दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांच्या हालचाली आता पोर्टलवर

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विविध विकासकामे आणि योजनेची कामे पाहण्याच्या नावाखाली महापालिकेतील बहुतांश अधिकारी तसेच कर्मचारी दांडी मारून घरी आराम करतात किंवा खासगी कामे करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत काही बाबी निदर्शनास आल्याने मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी करत स्थळपाहणीसाठी जाताना यापुढे अधिकार्‍यांना मूव्हमेंट रजिस्टरमध्ये नोंद करण्याबरोबरच मनपाच्या पोर्टल किंवा अ‍ॅपमध्येदेखील नोंद सक्तीची केली.

मनपा प्रशासनाने महापालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालये तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध उपकार्यालयांच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक केले आहे. कामावर येताना तसेच कार्यालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर अशा दोन्ही वेळी कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु, मनपा आयुक्तांनी या हजेरीतून अधिकारी तसेच अभियंत्यांना वगळले आहे. ही सवलत देताना हालचाल म्हणजेच मूव्हमेंट रजिस्टरमध्ये बाहेर जातानाची नोंद करण्याबाबतही अधिकार्‍यांना सवलत देण्यात आली होती. परंतु, अनेक अधिकारी या सवलतींचा गैरफायदा घेत असल्याची बाब निदर्शनास आली. स्थळपाहणीच्या नावाखाली अनेक अधिकारी गायब होताना आढळून आले आहेत. बर्‍याचदा एखाद्या गोष्टीसाठी अधिकार्‍यांना बोलवायचे झाल्यास अधिकारी स्थळ पाहणीसाठी (साइट व्हिजिट) गेल्याचे हमखास उत्तर दिले जाते. यामुळे आयुक्तांनी आता साइट व्हिजिटला जाणार्‍या अधिकार्‍यांना हालचाल नोंदवहीमध्ये कारण स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे कार्यालयीन वेळेत अधिकारी नागरिकांना उपलब्ध होतील. महापालिकेच्या पोर्टल किंवा अ‍ॅपमध्ये हालचाल नोंदवहीप्रमाणे सुविधा निर्माण करण्याची सूचना आयुक्तांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाला दिली.

आयुक्तांकडून तातडीची बैठक
आयुक्तांच्या भूमिकेमुळे खासगी कामे तसेच घरी आराम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांना आळा बसणार आहे. मागील आठवड्यात नाशिकरोड विभागीय कार्यालयात स्वच्छता विभागाच्या दोन कर्मचार्‍यांना लाच घेताना अटक झाली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी ट्रॅप लावल्याची चर्चा होती. हा प्रकार महापालिकेची प्रतिमा खराब करण्यासारखाच असल्याने त्याची दखल घेत आयुक्तांनी बैठक बोलावून अधिकार्‍यांना विविध सूचना केल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक महानगरपालिका : दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांच्या हालचाली आता पोर्टलवर appeared first on पुढारी.