नाशिक महापालिका करणार २५ हजार आरटीपीसीआर टेस्ट

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी रॅपिड ॲन्टिंजेन टेस्ट किट प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने महापालिकेने सामाजिक दायित्वाच्या उपक्रमातून २५ हजार आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीचे त्यासाठी सहकार्य मिळणार आहे.

सामाजिक दायित्वातून आरटीपीसीआर टेस्टचा निर्णय

ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर हिवाळा आणि सण व पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. शासनाने महापालिकेला तशा सूचना देत सुरक्षेची अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. गोवा, गुजरात, दिल्ली व केरळ राज्यांमधून नाशिकला येणाऱ्या नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. परंतु किट मिळण्यास विलंब होत असल्याने आरटीपीसीआर टेस्टसाठी पुणे व औरंगाबाद महापालिकांप्रमाणे नाशिक महापालिकेने सामाजिक दायित्वातून आरटीपीसीआर टेस्टचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीकडून महापालिकेला २५ हजार आरटीपीसीआर टेस्ट मोफत करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मेट्रोपॉलिस लॅबशी तसा करार केला आहे.

...तर अडीच कोटींची बचत

महापालिका एका चाचणीमागे लॅबला ९८० रुपये दर अदा करते. सामाजिक दायित्वाच्या निधीतून पंचवीस हजार टेस्ट झाल्यास अडीच कोटी रुपयांची बचत होणार आहे.